३६ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत करा
By admin | Published: May 23, 2015 02:26 AM2015-05-23T02:26:03+5:302015-05-23T02:26:03+5:30
सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते.
वर्धा : सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते. रुग्णालय व परिसरात हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून कार्यरत होते. कामावरुन कमी करताना व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना १ मे पासून अटेन्डन या पदावर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटुनही अद्याप कामावर पूर्ववत केले नाही. केवळ पाच कर्मचाऱ्यांना रुजु करुन घेतले. यामुळे ३६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून कामावर पूर्ववत करण्याची मागणी आहे.
याबाबत कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, खा. रामदास तडस, तहसीलदार वर्धा यांना देण्यात आली आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करताना पूर्ववत करण्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. याकरिता कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेचे कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे मागितले होते. त्यानुसार व्यवस्थापनाकडे कागदपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. यात अटेन्डन या पदाकरिता काम करण्यास तयार आहात काय, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला सदर पदावर काम करण्यासाठी होकार दिला होता. यानंतर व्यवस्थापनाने १ मे २०१५ पासून अटेन्डन या पदावर बाय आॅर्डर रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले होते. याला २० दिवसांचा कालावधी लोटला. पण अजूनही कामावर पूर्ववत करण्यात आले नाही. यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)