निर्बंध शिथिल; पण आरटीपीसीआरची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:00 AM2021-06-04T05:00:00+5:302021-06-04T05:00:20+5:30
राज्य शासनाने लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढविला असून जिल्ह्यांतर्गत परिस्थिती लक्षात घेता काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी भरल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी १ जूनपासून ते १५ जूनपर्यंत निर्बंध शिथिल करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार व्यावसायिकांना दिवस ठरवून देत सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या प्रकोप लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली आहे. त्यामुळे दुकानांचीही वेळा ठरवून दिल्या आहेत. परंतु आता व्यावसायिकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र राहणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढविला असून जिल्ह्यांतर्गत परिस्थिती लक्षात घेता काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी भरल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी १ जूनपासून ते १५ जूनपर्यंत निर्बंध शिथिल करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार व्यावसायिकांना दिवस ठरवून देत सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढणार असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यापारी, दुकानदार, दुकानातील कामगार, डिलिवरी बॉय, वाहन चालक, रिक्षा चालक, फेरीवाले आणि इतर सेवापुरवठादार या सर्वांनी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ७ जूनपासून सर्व व्यावसायिकांकडे आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या पथकाकडून प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असून ज्यांकडे प्रमाणपत्र राहणार नाही, त्या व्यावसायिकावर १ हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाणार आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. व्यावसायिक तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीकरिता लोकमहाविद्यालय, मदनमोहन धर्मशाळा कच्ची लाईन, धुनिवाले मठ व कस्तुरुबा ई-स्कूल बोरगाव (मेघे) येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी जाऊन चाचणी करुन घ्यावी आणि प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
विपीन पालीवाल, मुख्याधिकारी, न.प.वर्धा