रसुलाबादवर कृत्रिम जलसंकटाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:23 PM2018-03-04T23:23:33+5:302018-03-04T23:23:33+5:30
ऑनलाईन लोकमत
वर्धा : आर्वी तालुक्यातील रसुलाबाद हे गाव कष्टकºयांचे अन् मातब्बर राजकीय पुढाºयांचे; पण सध्या येथील राजकीय पुढाऱ्यांसह काही शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गत काही दिवसांपासून रसुलाबाद येथील पाणी पुरवठा योजनेचे बंद पडलेले काम. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
रसुलाबाद येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने सुमारे १ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या विकास कामादरम्यान ५० हजार लिटर क्षमतेचा एक जलकुंभ, बारा (सोनेगाव) शिवारात एक विहीर, पाणी पुरवठ्याच्या विहिरीपासून ते जलकुंभ पर्यंतची सुमारे साडे तीन कि.मी.ची जलवाहिनी तसेच गावात सुमारे सात हजार मिटरची जलवाहिनी आदी कामे करण्यात येणार आहे.
सदर विकास कामाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून दिल्यानंतर कामाचा कंत्राट देण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हा कंत्राट अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शहाने नामक कंत्राटदाराला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामालाही सुरूवात केली. मात्र, अवघ्या काही दिवसातच काम बंद पडल्याने ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे विकास काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नसल्याने बंद पडलेले पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. शिवाय हे काम तात्काळ सुरू न झाल्यास प्रहार रस्त्यावर उतरेल असा इशारा आर्वीच्या गटविकास अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
थंडबस्त्यातील कामाला गती द्या - पं.स. सदस्य
रसुलाबाद येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे विकास काम गत काही दिवसांपासून बंद आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने हे काम युद्धपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे. संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आर्वीच्या गट विकास अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून पंं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी केली आहे.
पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले आहे. गारपीट झाल्याने कंत्राटदाराने काही दिवसांसाठी काम थांबविले होते. विहीर खोदकामासाठी लागणारे पाटबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र ग्रा.पं.ला प्राप्त झाले आहे. लवकरच थांबलेले काम सुरू होईल.
- राजश्री धारगावे, सरपंच, रसुलाबाद.
विहिरीला पाणी भरपूर आहे. काही उपकरणे लावली;पण पाणी कमी होण्याचे नाव घेईना. तेथे विद्युत जोडणीची गरज असून विद्युत जोडणी अभावी काम थांबले. नुकताच आपण जास्त व्हॅटचा डायनोमा खरेदी केला आहे. त्याच्या सहाय्याने विद्युत निर्मिती करून विहिरीतील पाणी कमी करीत काम सुरू करू. मंगळवारपासून काम सुरू होईल.
- अशोक शहाने, कंत्राटदार.
कंत्राटदाराकडे अपुरी उपकरणे
रसुलाबाद येथील पाणी पुरवठा योजनेचे काम करताना कंत्राटदाराने सुरूवातीला विहीर खोदण्याच्या कामाला प्राधान्य दिले. ज्या ठिकाणी विहीर खोदल्या जात आहे त्यासाठी आवश्यक असणारे पाटबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अद्यापही रसुलाबाद ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
इतकेच नव्हे तर अर्धवट खोलकाम झालेल्या विहिरीला जलाजम पाणी लागले. परंतु, पाहिजे तशी उपकरणे नसल्याने सध्या काम बंद असल्याचे व लवकरच काम सुरू होणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.
विद्युत जोडणीसाठी अडलयं घोडं
ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरू आहे तेथे खोदकामादरम्यान मुबलक पाणी लागले. कंत्राटदाराने सुरूवातीला त्याच्याकडे असलेल्या उपकरणांच्या सहाय्याने विहिरीतील जल पातळी करून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला;पण त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आल्याने रसुलाबादच्या सरपंचासह ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहीती देण्यात आली.
सदर प्रकरणी दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणला पत्र लिहीत विहिरीच्या परिसरात कंत्राटदाराला विद्युत जोडणी देण्याची विनंती केली. परंतु, अद्यापही विद्युत जोडणी देण्यात आली नसल्याचे सरपंच राजश्री धारगावे यांनी सांगितले.