लोकप्रतिनिधी आणि सामान्य श्रोत्यांची साहित्य संमेलनाकडे पाठ; कवी, गझलकरांचा उत्साह पाहण्यासारखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 07:12 PM2023-02-04T19:12:39+5:302023-02-04T19:13:28+5:30
Wardha News मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.
नरेश डोंगरे!
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.
५३ वर्षांनंतर बापू विनोबाच्या कर्मभूमीत साहित्यनगरी पुन्हा एकदा सजली आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन भव्य दिव्यच आहे आणि त्यामुळे हा एकूणच परिसर कमालीचा देखणा झाला आहे. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात ५० खोक्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लावल्याने संमेलनाला काही वेळेसाठी अस्वस्थ केले होते. जवळपास प्रत्येकच डोममधील खाली खुर्च्यांची संख्या श्रुती पृष्ठ झाल्याची चुगली करत होती.
जत्रा फुलली, मात्र...
सायंकाळी साहित्यिकांची, कवी आणि गझलकारांची गर्दी वाढल्याने परिसरात उत्साह ओसंडून वाहू लागला, परंतु साहित्यिक, कवी, गझलकारांच्या जत्रेत श्रोत्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. अध्यक्षीय भाषणाच्या वेळीचे आचार्य विनोबा भावे सभामंडपातील चित्र खूपच बोलके होते.
निधी दिला, जबाबदारी संपली
वर्धा जिल्ह्यात चार आमदार आणि एक खासदार आहेत. देवळीचे आमदार वगळता तीनही आमदार आणि खासदार भाजपचेच आहेत. त्यातील वर्धेचे आमदार पंकज भोयर हे उद्घाटन कार्यक्रमापुरतेच मंचावर दिसले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार आणि खासदार तर सोडा, विविध पक्षांचा कोणताही मोठा नेता या परिसरात फिरताना दिसला नाही. संमेलनाला प्रत्येक आमदार, खासदारांनी दहा-दहा लाख रुपये आपल्या निधीतून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, निधी दिला आणि आपली जबाबदारी संपली, अशीच भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे शनिवारी सायंकाळपर्यंत चित्र होते.
कशाचा इफेक्ट?
लोकप्रतिनिधीने सारस्वतांच्या मेळ्यापासून राखलेले अंतर कशाचा इफेक्ट आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या संबंधाने वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. काहींनी आपले नेते आले नसल्याने इकडे येण्याचे टाळले असावे, तर काहींचा विधानपरिषद निवडणुकांनी भ्रमनिरास केल्यामुळे ते इकडे येऊ शकले नसावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सूर्य, चंद्र, आकाश, तारे सारे सारे!
या साहित्य संमेलनात सूर्य, चंद्र, आकाश, तारे असे सारे सारे अवतरले. शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या अवस्थेचीही चर्चा झाली. मात्र, केवळ कवी संमेलन आणि गझल कट्ट्यावर!
-----