यंत्रसामग्री व पुरवठ्याची रक्कम जाणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:08 PM2018-02-01T23:08:00+5:302018-02-01T23:08:21+5:30
दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये नियोजनाअभावी अखर्चित आहे.
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये नियोजनाअभावी अखर्चित आहे. सध्या फेबुवारी महिना सुरू झाल्याने ही रक्कम खर्च होणे शक्य नसल्याने ती आता परतीच्या मार्गावर आहे.
कारंजा तालुक्यात हेटीकुंडी येथे गवळाऊ गायींचे शासकीय पशुपैदास केंद्र निर्माण करण्यात आले. शासकीय असलेल्या या केंद्राकडे मध्यंतरी सर्वांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतरच्या काळात शासनाच्यावतीने या केंद्राला पुन्हा जीवित करण्याकरिता अनुदान दिले. मात्र जबाबदारी असलेल्या अधिकाºयांकडून याकडे कामय दुर्लक्ष झाले. यामुळे प्रकल्पाची असलेली दैना कायम आहे. परिणामी येथून गवळाऊ गायींचे संगोपण होईल अथवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या येथे असलेल्या जनावरांच्या सुविधा पुरविण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसागम्री आणि औषधसाठा खरेदी करण्याकरिता शासनाच्यावतीने यंदाच्या आर्थिक वर्षात १२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. यातून प्रकल्पाकरिता काही आधुनिक साहित्य खरेदी करण्याकरिता ही रक्कम खर्च होणे अपेक्षित होते. मात्र जबाबदारी असलेल्या अधिकाºयांच्या नियोजनशुन्यतेमुळे आलेल्या अनुदानापैकी केवळ तीन लाख रुपयेच खर्च झाले. उर्वरीत रक्कम खर्च होणे आता शक्य नसल्याने ती रक्कम परत जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात एकमेव असलेल्या या शासकीय प्रकल्पाप्रती शासकीय अधिकारी किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
केंद्रात १२४ जनावरे
सुमारे शंभर एकरात विस्तारीत असलेल्या या केंद्रात आजच्या घडीला १२४ जनावरे असल्याचे पशुसंवर्ध विभागाकडून सांगण्यात आले आहे. या जनावरांचे संगोपण आणि त्यांची देखभाल करण्याकरिता या केंद्रात मोठी यंत्रणा देण्यात आली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे येथील जनवरांची हालत खस्ता झाली आहे. त्यांना पोषक आहारही येथे दिल्या जात नसल्याची ओरड आहे. यामुळे जनावरे कुपोषित होत असल्याची ओरड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चाऱ्याच्या आगीबाबतचा तपास थंडावला
गत दोन महिन्यापुर्वी येथे असलेल्या चारा प्रकल्पाला आग लागली होती. या आगीवर येथे कार्यरत कर्मचाºयांनी महावितरणच्या अधिकाºयांच्या माध्यमातून ताबा मिळविला होता. यात बहुतांश चारा बचावला. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या सर्व प्रकाराला येथे असलेल्या व्यवस्थापनाचा गलथान कारभार एक कारण असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा प्रकार थांबविण्याकरिता या प्रकल्पाची नागपूर येथील अधिकाºयाकडे असलेली जबाबदारी काढून ती जिल्ह्याच्या अधिकाºयाकडे सोपविण्याचा ठराव झाला होता. तो ठराव पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या येत्या सभेत प्रश्न उपस्थित करणे गरजेचे झाले आहे.
कारभार चालतो नागपुरातून
या प्रकल्पाची जबाबदारी असलेले डॉ. सतीश राजू हे नागपूर वळू संगोपण केंद्रात प्रक्षेत्र व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दर्जाचे वर्धा जिल्ह्यात एकूण पाच अधिकारी आहेत. डॉ. राजू नागपुरात असल्याने त्यांच्याकडून या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देणे शक्य नाही. तरीही ते जमेल तसे प्रकल्पाला भेट देत आपली जबाबदारी पार पाडतात. यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करून ही जबाबदारी वर्धेतील अधिकाºयावर सोपविल्यास प्रकल्पाकडे लक्ष देता येईल असे येथील अधिकारी बोलत आहेत.