गिट्टी खदानवर महसूल विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:18 IST2018-10-29T00:17:13+5:302018-10-29T00:18:09+5:30
वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली.

गिट्टी खदानवर महसूल विभागाची धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. यामुळे खदानधारकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक गिट्टी खदानी आणि क्रेशर येळाकेळी शिवारात आहे. मात्र तेथे सुरू असलेल्या १०० च्या जवळपास क्रेशर मशीन चालकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नाही, अशी तक्रार उपविभागीय अधिकारी दिघे यांना प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने आणि इतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन खदानीवर धडक दिली. यावेळी सर्वांकडे कागदपत्रांची मागणी केली. काही खदानधारकांनी उपलब्ध कागदपत्रे दाखविली. मात्र, सहा गिट्टी खदानधारकांकडे फक्त परवाने असल्याचे दिसून आले. बºयाच गिट्टी खदानचालकांनी कागदपत्रे सोमवारी कार्यालयात आणून सादर करु, असे सांगितले. तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी यावेळी गिट्टी खदानधारकांना त्यांच्याकडे असलेली रॉयल्टी पुस्तके, विद्युत बिलाची पावती तसेच टॅक्सच्या पावत्या सादर कराव्यात, असे बजाविले. जे खदानधारक विहित मुदतीत कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांचे क्रेशर सीलबंद करण्यात येईल, तसेच सील उघडून कारभार करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी यावेळी दिली. येळाकेळी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मारलेल्या अचानक धाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अधिकाऱ्यांनी ख दानधारकांना कागदपत्र सादर करण्याच्या सूचना केल्यानंतरही मुदतीत कागदपत्रे सादर केले नाही तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करणार असल्याचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी सांगितले. सुटीच्या दिवशीही अधिकाऱ्यांनी खदानीवर धाड टाकून कागपत्राची तपासणी केल्याने सारेच आता सजग झाले आहे.