महसूल विभाग सर्वाधिक लाचखोर
By Admin | Published: December 4, 2015 02:13 AM2015-12-04T02:13:42+5:302015-12-04T02:13:42+5:30
लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते.
२२ महिन्यांत ३७ गुन्हे : पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
गौरव देशमुख वर्धा
लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अडीच वर्षांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३७ गुन्हे दाखल केले आहेत. यात लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. लाचखोरीत महसूल विभाग जिल्ह्यात अव्वल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक पोलीस विभागाचा असल्याचे समोर आले आहे.
कुठलेही काम करून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जाते. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, २०१४ मध्ये १२ महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जणांविरूद्ध संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यात ४ लाख ९९ हजार ८०० रुपयांची माया जप्त केली आहे. २०१५ मध्ये १० महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजू जैन यांच्या मार्गदर्शनात १४ जणांविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना गजाआड केले आहे.
२०१४ मध्ये केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभाग ९, पोलीस विभाग ३, आरटीओ १, समाज कल्याण १, जिल्हा परिषद बांधकाम विभाग १, ग्रामविकास यंत्रणा अधिकारी १, सरपंच १, ग्रामसेवक २, न्याय विभाग १, कृषी विभाग १, महिला व बाल कल्याण विभाग १, वनविभाग १ आणि नगर विकास मंत्रालय १ असे २४ जणांचा समावेश आहे. या सर्वांना सापळा रचून एसीबीने रंगेहात पकडून गजाआड केले.
२०१५ मध्ये १० महिन्यांत १२ जणांना रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले. यात महसूल विभाग ४, पोलीस विभाग २, न्याय विभाग १, जिल्हा परिषद गटविकास अधिकारी १, बांधकाम विभाग १, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ १, पंचायत समिती १, कृषी विभाग १ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ १ आदींचा समावेश आहे. २२ महिन्यांमध्ये जिल्ह्यात महसूल विभागाच्या १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ३७ प्रकरणांतील १३ जण महसूल विभागाचे असल्याने सर्वाधिक लाचेची मागणी महसूल विभागाकडून केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीस विभागातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाच मागण्याच्या प्रकाराला आळा घातला जावा, ही अपेक्षा असते; पण हे प्रकार फार कमी होताना दिसून येत नाही. नागरिकांची कामे सरळ व पारदर्शक होण्याकरिता कर्तव्यतत्परता जपणे गरजेचे झाले आहे. आता प्रत्येक कामाचा निश्चित कालावधी दिल्याने लाच मागण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जनजागृतीची गरज
जनसामान्यांशी निगडीत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस विभाग द्वितीय क्रमांकावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विविध कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यासह देशात सर्वत्र लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर पायबंद घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव तत्पर आहे. लाच घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने कामगिरी पार पडणे एक आव्हान ठरत आहे. यासाठी नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे गरजेचे आहे.