वडाळा घाटावर महसूलची धाड
By admin | Published: April 17, 2017 12:37 AM2017-04-17T00:37:31+5:302017-04-17T00:37:31+5:30
आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे.
दोन बोटी जप्त : ताबा मिळवण्यापूर्वीच वाळू खनन
वर्धा : आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे. असे असताना घाटामध्ये रेती खननाकरिता बोटी आढळून आल्यात. सोरटा गावच्या पाणी पुरवठा योजनेतून गढूळ पाणी पुरवठा झाल्याने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांसह गावकऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी दोन बोटी जप्त करण्यात आल्या.
सोरटा येथे रविवारी पाणी पुरवठा योजनेतून गावकऱ्यांना गढूळ आणि डिझेलमिश्रीत पाणी आले. त्यामुळे गावकऱ्यांनी याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम यांच्यासह उपसरपंच मंगेश मानकर, महेंद्र मानकर, मंगेश गवारले, प्रशांत सरोदकार, दत्तू कडू, दीपक देवगडे, आकाश मडवे, अमर आपुरकर, शुभम गावंडे, सुहास देवगडे, आधार भस्मे, सागर डफळे, हर्षद कडू, संतोष टाले, शिवकुमार पांडे, शंकर पांडे, अरवींद गेटमे, सचिन अलोणे आदींनी विहीर गाठून पाहणी केली.
येथे वडाळा येथील वर्धा नदीच्या घाटात वाळू उत्खननाकरिता बोटींचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गावकऱ्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती दिली. सोबतच महसूल विभागालाही कळविण्यात आले. पोलीस पाहणी करून निघून गेले तर महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यांना घाट गाठून बोटींच्या जप्तीची कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या आष्टा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. वडाळा घाटाचा लिलाव असताना ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथून उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटींच्या वापराने नदीपात्रातील पाणी गढूळ तसेच दूषित होत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविल्या जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पाण्याचा प्रवाहही रोखला
वाळू उपस्याकरिता पाण्याचा प्रवाह अडविल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पाणी अडवून वाळूचे खनन सुरू आहे. त्यात बोट आणि डिझलचा वापर होत असल्याने नागरिकांना गढूळ पाणी वापरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घाटाचा ताबा मिळाला नसतानाही बोट, पोकलँडच्या साहाय्याने खनन सुरू आहे. याला कोणाची संमती असा नवचा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.
एकीकडे वॉटर कप, दुसरीकडे वॉटर टब
आर्वी तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे मात्र उपलब्ध पाण्याचा टब (डबके) बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नदीच्या पात्रांमध्ये वाळू उपस्याकरिता सर्वच नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्याकरिता अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.