सोमवारीच घेतली आढावा बैठक
By admin | Published: January 19, 2016 03:20 AM2016-01-19T03:20:53+5:302016-01-19T03:20:53+5:30
गत महिन्यात २८ डिसेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक
पंचायत समित्यांतील प्रकार : पालकमंत्र्यांच्या सूचनांचा पडला विसर
पराग मगर ल्ल वर्धा
गत महिन्यात २८ डिसेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यात सर्व अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य आहे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; पण या सूचनाच पंचायत समिती स्तरावर न पोहोचल्याने जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये ग्रामसचिवांची आढावा बैठक घेण्यात आली. यामुळे सोमवारच्या आदेशाचा प्रशासनास विसर पडल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात आल्यावर वर्धा पं.स. ची बैठक त्वरित स्थगित करण्यात आली; पण काही समित्यांच्या बैठकी सुरूच होत्या.
महिन्याच्या प्रत्येक २ व १८ तारखेला प्रत्येक तालुक्यातील ग्रामसचिवांची बैठक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली जाते. यात अनेक मुद्दे चर्चिले जातात. सूचनाही केल्या जातात. त्यामुळे यात वावगे असे काहीच नाही; पण तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी या दिवशी राहत नसल्याने ग्रामस्थांच्या कामाचा होत असलेला खोळंबा, ही बाब नवीन नाही. रविवारच्या सुटीनंतर सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. त्यामुळे आपली कामे व्हावी, अशी स्वाभाविक इच्छा नागरिकांची असते. परिणामी, सोमवारी कुठलीही बैठक शासकीय स्तरावर आयोजित करू नये तसेच अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयातच राहावे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये वा बैठकीचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले होते; पण या सूचनेला बगल देत आठही तालुक्यात १८ जानेवारी रोजी सोमवारी बैठका बोलविण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक सोमवारी तालुकास्थळी बैठकीसाठी आले होते.
महिन्याच्या २ आणि १८ तारखेला अशा बैठका होत असल्याची माहिती आहे. १८ तारखेचा सोमवार पाहता ही बैठक आधी वा नंतर घेणे गरजेचे होते; पण पालकमंत्र्यांच्या सूचनाच पंचायत समिती स्तरावर पोहोचल्या नसल्याने सर्वच तालुक्यात या बैठका घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही बाब जाणून घेण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता तात्काळ सूचना देण्यासाठी, ही बैठक बोलावली असून ती समाप्त झाल्याचेही सांगण्यात आले. शिवाय माहिती अभियानाची माहिती देण्याकरिता ही बैठक तात्काळ बोलविल्याचे सांगून सावरासावर करण्याचा प्रयत्नही प्रशासनस्तरावर झाला.
माहिती अभियानाबाबत बैठक असल्याचे कारण
४खरे पाहता सोमवारची ही बैठक रद्द करणे गरजेचे होते; पण मंगळवारी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट ग्रामस्तरावर पोहोचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे माहिती अभियान राबविले जात आहे. याची माहिती देण्यासाठी ही बैठक असल्याचे संबंधितांनी सांगितले. सोमवारी ग्रामसचिवांना बोलवून मंगळवारच्या कार्यक्रमाची माहिती देण्याचा हा कुठला प्रकार, असा प्रश्नही उपस्थित झाला. विशेष म्हणजे माहिती अभियानाबद्दल आधीच ग्रामसचिवांना ‘व्हॉट्स अॅप’वर माहिती दिली होती. ज्यांचा सत्कार होणार आहे, त्यांनाही मंगळवारच्या कार्यक्रमाबद्दल पूर्ण कल्पना होती. यामुळे हा केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले. आढावा बैठकीप्रमाणे आधी चर्चा झाल्याचेही काही ग्रामसचिवांनी ‘लोकमत’ला सांगितले. सूचना दिल्यावर बैठक बरखास्त झाल्याचे सांगण्यात आले.
‘लोकमत’ने निदर्शनास आणताच सावरासावर
४सोमवारी कुठल्याही विभागात अधिकारी वर्गाची बैठक घेऊ नये, अशा सूचना खुद्द पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत; पण या सूचना सर्वच स्तरावर देण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर पडला. परिणामी, ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर लागोलग वर्धा पंचायत समितीत सुरू असलेली बैठक थांबविण्यात आली. काही तालुक्यांत नियमाप्रमाणे ही बैठक सुरूच होती; पण उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फोन केल्यामुळे काही ठिकाणी सुरू असलेली बैठक तात्काळ थांबविण्यात आल्याचीही माहिती आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचनांचा विसर
४सर्व अधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य आहे. कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत; पण या सूचना अद्याप पंचायत समिती स्तरावर पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. यावरून या सूचना देण्यास प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती अभियानांतर्गत मंगळवारी असलेल्या कार्यक्रमाबद्दल तात्काळ माहिती देण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली; पण सोमवारी बैठक न घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना असल्याचे निदर्शनास येताच ती बरखास्त करण्यात आली. यानंतर सोमवारी कुठलीही बैठक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- यशवंत सपकाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वर्धा.