वाहनांचे निर्जंतुकीकरण केंद्राचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:00 AM2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:09+5:30
१० दिवसांपासून परराज्यासह अन्य जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तूंची जवळपास १०० जड व मध्यम लहान वाहनांतून आवक होत आहे. तर गत दोन दिवसांपासून आले, लसूण, कांदा, फळांची सुद्धा आवक सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : दररोज जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारे लहान मोठे कोणतेही वाहन व चालक-वाहक कोरोना विषाणूचे वाहक ठरू नये म्हणून शासनाने लोकवस्तीपासून दूर दोन निर्जंतुकीकरण केंद्र १० दिवसांपासून सुरू केले. या केंद्रात होणाऱ्या निर्जंतुक प्रक्रियेची आमदार समीर कुणावार व उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांनी पाहणी करून सूचनांचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश दिले.
यावेळी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, तहसीलदार श्रीराम मुंधडा, ठाणेदार सत्यविर बंडीवार, प्रवीण पटेलिया, मुकुंद सांगणी, कंत्राटदार अशोक चंदनखेडे, नितीन लुणावत तसेच धान्य, किराणा, दालमिल व भाजीपाला, फळ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
१० दिवसांपासून परराज्यासह अन्य जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तूंची जवळपास १०० जड व मध्यम लहान वाहनांतून आवक होत आहे. तर गत दोन दिवसांपासून आले, लसूण, कांदा, फळांची सुद्धा आवक सुरू झाली आहे. बाहेरून येणारी जड वाहने नागपूर मार्गावरील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर रिमडोह येथे पीएमपी ट्रान्सपोर्ट येथे तर मध्यम जड मेटॅडोर, छोटा हत्ती इत्यादी वाहनांचे एपीएमसी कापूस मार्केट येथे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या केंद्रात वाहनांचे निर्जंतुकीकरण झाल्याची पावती पाहूनच वाहनातील माल, साहित्य उतरविण्याच्या सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मालाची हमालाद्वारे उचल करून तोपर्यंत या वाहनांच्या चालक व वाहकाला इतरांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी संबंधित व्यापाऱ्यांवर टाकली आहे. तसेच अन्य जिल्ह्यात किंवा परराज्यात जाऊन माल ने-आण करणाºया वाहनांचे चालक-वाहक स्थानिक रहिवासी असल्यास त्यांना त्यांच्याच घरी ठेवण्याचे व कोणत्याही परिस्थितीत संबंधित चालक, वाहक सार्वजनिक ठिकाणी फिरणार नाही, याची दक्षता घेण्याचे ट्रकमालकांना सूचित केले आहे.