वर्धा व जाम मार्गाची फेर मोजणी करा
By admin | Published: June 18, 2017 12:37 AM2017-06-18T00:37:58+5:302017-06-18T00:37:58+5:30
प्रत्यक्षात अंतर कमी असताना परिवहन महामंडळ अधिक शुल्क आकारत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : प्रत्यक्षात अंतर कमी असताना परिवहन महामंडळ अधिक शुल्क आकारत आहे. यात प्रवाशांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. हा प्रकार हिंगणघाट ते वर्धा व हिंगणघाट ते जाम मार्गावर घडत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दोन्ही मार्गांची पुन्हा मोजणी करून प्रवास भाडे ठरवावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. याबाबत आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट ते वर्धा मार्गाचे अंतर प्रत्यक्षात केवळ ४१ किमी आते. त्याचे अंतर ४२ किमीपेक्षा जास्त दर्शवून अधिक प्रवासी भाडे आकारले जात आहे. शिवाय हिंगणघाट ते जाम हे प्रत्यक्ष अंतर केवळ ११ किमी असून त्याचे भाडे १२ किमीच्या हिशेबाने आकारले जात आहे. अद्यापही भाडे अधिक आकारले जात असल्याचे प्रत्यक्ष मोजणीत आढळून आले आहे.
यामुळे दोन्ही मार्गांची फेरमोजणी करावी. ही मोजणी लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी मंडळाचे सदस्य आदींच्या उपस्थितीत करावी. विभागीय वाहतूक अधिकारी वर्धा यांच्या समक्ष मोजणी प्रक्रिया करावी. सत्यता पडताळून प्रत्यक्ष अंतर जेवढे असेल तेवढेच भाडे आकारण्यात यावे, अशी मागणी आपने केली आहे. आगार प्रमुखांना निवेदन देताना मनोज रूपारेल, प्रमोद जुमडे, क्षीरसागर, धवणे, भाऊराव कोटकर, अखिल धावडे, जगदीश शुक्ला, माणिक धोटे, विनोद कुंभारे आदी उपस्थित होते.