टिश्यू कल्चरमुळे केळीच्या लागवडीत क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:15 AM2018-06-27T00:15:04+5:302018-06-27T00:21:03+5:30
केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. जवळपास ३३ हजार पिलांची लागवड पूर्ण झाली असून उन्हाळ्यातील ४७ डिग्री सेल्सीयस तापमानातही त्यांच्या केळीला कुठलेही नुकसान झाले नाही, हे विशेष.
वाघमारे यांनी पवनार येथील शेतात २० फेब्रुवारी २०१८ ला ७ हजार ५०० टिशू कल्चर केळीच्या पिलांची लागवड केली. तपत्या उन्हातही त्यांनी केळीचे व्यवस्थित संगोपन केले. त्यानंतर लगेच १० जूनला १८ हजार टिशू केळींची पुन्हा लागवड केली. जुनी असलेली ७ हजार ५०० केळी खांब उत्पन्नाच्या तयारीत आहे. आता १५ आॅगस्टला ७ हजार ५०० केळी खांबाची लागवड केली जाणार आहे. एकूण ४० हजार केळी खांबांची लागवड वाघमारे यांच्या शेतात होत आहे. केळीच्या मध्ये दुसरे आंतरपिकही ते घेत असल्याने त्यांना दुहेरी उत्पन्नाचे साधन या माध्यमातून मिळाले आहे. विदर्भात नागपूर व वर्धा जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. हा विदर्भातील केळी लागवडीचा विक्रमच ठरला आहे. खानदेशातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या या केळी बगीच्याची पाहणी केली. शिवाय व्यवस्थापनाची माहिती जाणली. केळी लागवडीचे काम मजुरांकडून सुरू आहे.