व्हर्च्युअल ह्युमन लॅब वैद्यकशास्त्रासाठी क्रांतिकारी
By admin | Published: November 19, 2016 01:12 AM2016-11-19T01:12:00+5:302016-11-19T01:12:00+5:30
मानवी शरीररचनेतील इत्यंभूत व अद्यावत प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली व्हर्च्युअल ह्युमन लेबॉरेटरी ....
मिश्रा यांची माहिती : आशियातील पहिले प्रशिक्षण
वर्धा : मानवी शरीररचनेतील इत्यंभूत व अद्यावत प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली व्हर्च्युअल ह्युमन लेबॉरेटरी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्विय झाली आहे. या प्रयोग शाळेत पहिला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स अॅनाटामेज टेबल स्थापित केला असून अमेरिकन हार्ट असोसिएशनद्वारे आशियातील पहिले प्रशिक्षण केंद्र म्हणून याला मान्यता दिल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सावंगी (मेघे) येथे पत्रपरिषदेत दिली.
रूग्ण, डॉक्टर, विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यवस्थापनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अद्यावत सुविधेबद्दल माहिती देताना डॉ. मिश्रा म्हणाले, सावंगीच्या आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने अथक परिश्रमातून मिळविलेल्या गुणवत्तेमुळे आणि या तंत्रज्ञानामुळे मानवी शरीरांतर्गत झालेल्या दुखापती, विकास अथवा बदलांबाबत प्राप्त अतिसुक्षम व अचून माहिती डॉक्टरांना सहायभूत ठरणारी आहे. त्यासोबतच शस्त्रक्रियेनंतर शरीराच्या आत होणाऱ्या बदलांबाबत शस्त्रक्रियेपूर्वीच्या रुग्णालाही या उपकरणामुळे स्पष्ट कल्पना येते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग असणाऱ्या शवविच्छेदनाचे कामही या उपकरणामुळे सोपे झाले असून गरजेपुरता मानवी मृतदेहांचा वापर वगळता या उपकरणामुळे शरीररचनेतील अतिसुक्ष्म बाबी विनाअपाय अचूकपणे समजून घेता येतील. अपघाती अथवा अंतर्गत दुखापतीमुळे मृत्यूचे कारणही शवविच्छेदनाशिवाय या उपकरणामुळे कळणे सोपे झाले आहे, असे ही डॉ. मिश्रा सांगितले.(शहर प्रतिनिधी)