चारही पोलीस ठाण्यात हक्काची ‘पार्किंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:02+5:30
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि सावंगी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यांकडे हक्काची पार्किंग आहे. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करण्याची गरजच पडत नाही. जर एखाद्याने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगादेखील उगारला जातो. त्यामुळे पोलीस जरी असतील तरी त्यांना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल, असे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्याकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय परिसराचा फेरफटका मारला असता चारही पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे हक्काची पार्किंग असल्याचे रिॲलिटी चेक केले असता दिसून आले. मात्र, जे पोलीस नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात असल्याचे दिसून आले.
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि सावंगी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यांकडे हक्काची पार्किंग आहे. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करण्याची गरजच पडत नाही. जर एखाद्याने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगादेखील उगारला जातो. त्यामुळे पोलीस जरी असतील तरी त्यांना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल, असे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्याकडून सांगण्यात आले.
शहरातही मोठ्या प्रमाणात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. मागील दोन वर्षांत अनेकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवरही पोलिसांचे लक्ष असून त्यांची गय केली जाणार नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पोलिसांकडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई केल्या जात आहे.
रामनगर पोलीस ठाणे
शहरातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात हक्काची पार्किंग असून कर्मचारी आणि अधिकारी आपली वाहने शिस्तबद्ध परिसरात लावत असल्याचे दिसून आले. तसेच तक्रार घेऊन येणाऱ्यांकडूनही शिस्तीतच वाहने लावण्याच्या सूचना ठाणेदार जळक यांनी दिल्या असल्याने कर्मचाऱ्यांकडून तक्रारकर्त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर पोलीस ठाणे
शहर पोलीस ठाण्याकडेही हक्काची पार्किंग असल्याने ठाण्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची वाहने पार्किंग परिसरातच उभी राहत असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर जप्त केलेली वाहने पार्किंग परिसरात राहत असल्याने वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे जप्तीतील सर्व वाहने दुसऱ्या बाजूला शिफ्ट करून ठाण्यासमोरील सर्व मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.
सावंगी पोलीस ठाण्यात जागा अपुरी
- शहरातील सावंगी (मेघे) पोलीस ठाणे रस्त्याच्या कडेला असल्याने पोलीस ठाण्याकडे हक्काची पार्किंग जरी असली तरी अपुऱ्या जागेमुळे अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावावी लागत असल्याचे चित्र आहे.
- मात्र, पोलीस अधिकाऱ्यांची वाहने पार्किंगमध्येच राहत असून काही प्रमाणातच वाहने पुरेशा जागेअभावी रस्त्याच्या कडेला लावावी लागत असल्याचे दिसून येते.
शहरातील चारही पोलीस ठाण्यांत हक्काची पार्किंग उपलब्ध असल्याने पोलीस कर्मचारी आपली वाहने पोलीस ठाण्यातच उभी करतात. मात्र, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई नक्कीच केल्या जाईल. शहरातही नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
-राजेश कडू, वाहतूक पोलीस निरीक्षक.