७.६० लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क

By Admin | Published: February 16, 2017 01:16 AM2017-02-16T01:16:44+5:302017-02-16T01:16:44+5:30

जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता उद्या गुरुवारी मतदान होत आहे.

Right to vote for 7.60 lakh voters | ७.६० लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क

७.६० लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क

googlenewsNext

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता आज मतदान : १५० जागांकरिता ८१८ उमेदवार रिंगणात
वर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता उद्या गुरुवारी मतदान होत आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकीकरिता एकूण ८१८ उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेचे २८९ तर पंचायत समितीच्या ५२९ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांकरिता जिल्ह्यातील ७ लाख ६० हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ३ लाख ९५ हजार ५०६ पुरुष तर ३ लाख ६४ हजार ९६७ महिला व ११ इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्याकरिता जिल्हा प्रशासनाचीही व्यवस्था पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता असलेल्या या निवडणुकीकरिता एकूण ९६१ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रावर कारभार सांभाळण्याकरिता एकूण ४ हजार २२९ कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यात १ हजार ५८ केंद्राध्यक्ष तर ३ हजार १७१ मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची मतदान केंद्रावर बुधवारीच रवानगी झाली आहे. मतदानाकरिता एकूण २ हजार ४३० इव्हीएमचा वापर होणार असून त्याही केंद्रावर पोहोचल्या आहेत.
मतदान कार्याकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची निवड झालेल्या स्थळी पाठविण्याकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक तालुका स्तरावरून या कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले. वर्धेतील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती.
उद्या होणाऱ्या मतदानात कुठलीही गडबड होणार नाही, याची पाहणी करण्याकरिता मुख्य निवडणूक निरीक्षक गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार हे वर्धेत दाखल झाले होते. त्यांच्याकडे हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी येथील काम पाहण्याची जबाबदारी आहे. तर कारंजा, आर्वी, आष्टी, सेलू या चार तालुक्यांसाठी भंडारा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्धा उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकार, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, समुद्रपूर तालुक्यात उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, देवळीत उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, कारंजात भंडाराचे सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., आर्वीत उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, आष्टीत उपजिल्हाधिकारी स्वप्नील तांगडे, तर सेलू तालुक्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांच्यावर आहेत.(प्रतिनिधी)

इव्हीएमसह कर्मचारी
मतदान केंद्रावर दाखल
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता एकूण ९६१ केंद्र आहेत. या केंद्रावर सर्व साहित्यानिशी कर्मचारी बुधवारी रवाना झाले. मतदानासाठी एकूण २ हजार ४३० ईव्हीएमची आवश्यकता आहे. त्यापैकी २ हजार २६ ईव्हीएम प्रत्यक्ष मतदान केंद्रावर लागणार असल्याची माहिती आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता कार्यकर्त्यांचीही फौज
उमेदवाराचा प्रचार झाला, मतदानाचा दिवस आला. या दिवशी आपल्याला मतदान होईलच याची शाश्वती नाही. यामुळे अनेक उमेदवारांकडून मतदान काढण्याकरिता कार्यकर्त्यांना ताकीद देण्यात आली आहे. प्रत्येक भागाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर सोपविली आहे. शिवाय मतदारांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी घेत मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती पुरविण्यात आली. यात काही उमेदवारांना यश आले तर काही अपयशी ठरले. यामुळे प्रत्येक भागातून मतदान काढण्याकरिता कार्यकर्ते तैनात झाले आहेत.

 

Web Title: Right to vote for 7.60 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.