ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचास सश्रम कारावास; दोन वर्ष रहावे लागेल कारागृहात
By महेश सायखेडे | Published: August 26, 2023 01:02 PM2023-08-26T13:02:55+5:302023-08-26T13:04:15+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
वर्धा : स्वाक्षरी देण्यास नकार देत वाद करून ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या वडद येथील तत्कालीन सरपंच सुशील जर्नादन वडतकर यास दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ व्ही. पी. आदोने यांदी दिला.
आरोपी सुशील जनार्दन वडतकर यास भादंविच्या कलम ३५३ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा सश्रम कारावास. भादंविच्या कलम ३३२ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास चार महिन्यांचा सश्रम कारावास. अजाजअप्रकाच्या कलम ३ (२) (va) अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
उगारली होती चप्पल
या प्रकरणातील फिर्यादी हे वडद येथे ग्रामसेवक म्हणून काम करायचे. विद्युत देयक न भरल्यामुळे जि.प.च्या शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. शाळेत मतदान केंद्र असल्याने विद्युत पुरवठा सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे फिर्यादीने वर्धा पंचायत समिती कार्यालयातील कक्षात वीज जोडणी नसल्याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून संबंधित सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश असल्याने अनुशंगाने फिर्यादी हे नोटशिट व फाईल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. त्यांना सरपंचाची स्वाक्षरी त्यावर हवी होती. आरोपी वडदचे तत्कालीन सरपंच सुशील वडतकर याने स्वाक्षरी देण्यासाठी नकार देत फिर्यादीसोबत वाद करून चप्पल उगारत हाता बुक्यांनी मारहाण करून लोकसेवकाला त्यांचे कामकाज पार पाडण्यात अटकाव केला. शिवाय दुखापत केली होती.
एसडीपीओंनी केला होता तपास
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यावर संबंधित प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. शासकीय बाजू ॲड. एच. पी. रणदीवे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सुजित पांडव व देवेंद्र कडू यांनी काम पाहिले. शासनातर्फे एकूण नऊ साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ व्ही. पी. आदोने यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.