‘विधीं’मुळे ‘उत्तरवाहिनी’ होतेय प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:52 PM2017-09-16T23:52:27+5:302017-09-16T23:52:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जल, जंगल, जमिनीसाठी देशपातळीवर मोठे लढे सुरू आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून शासनानेही प्रदूषण निर्मूलनाचा ध्यास घेतला. यातून स्वच्छतेच्या चळवळी उभ्या राहिल्या; पण त्या जिल्हास्तरावर पोहोचल्या नाही. गणेश विसर्जनात जिल्ह्यात अनेकांनी जल प्रदूषण रोखत खारीचा वाटा उचलला; पण अनेक विधींमुळे नदी घाटांचे प्रदूषण मात्र कायम आहे. कोटेश्वर येथील नदीपात्र या विधींच्या कचाट्यात अडकले आहे. यामुळे सध्या उत्तरवाहिनी प्रदूषित झाल्याचे चित्र आहे.
मध्यप्रदेशातून वाहणारी वर्धा नदी जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोटेश्वर-थाटेश्वर येथे उत्तरवाहिनी होते. या ठिकाणी दोन नद्यांचा संगम आहे. शिवाय मोठे शिवालय असल्याने या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या पर्यटन विभागानेही कोटेश्वरला तिर्थक्षेत्राचा क दर्जा दिला. यातून मोठा निधी मिळाल्याने झपाट्याने विकास कामे केली जात आहे. सभागृह, विश्रामगृह, घाटाचे बांधकाम, स्वच्छतागृह यासह अनेक बांधकामे प्रगतिपथावर आहेत. शिवाय कोटेश्वर ते थाटेश्वर झुलता पूलही येथे मंजूर आहे; पण अद्याप त्या कामाला मूर्त रूप आलेले नाही. हा सर्व विकास होत असताना उत्तरवाहिनी असलेल्या वर्धा नदीच्या पात्राकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मृत्यूनंतर दहाव्या दिवसासाठी महत्त्व लक्षात घेऊन पंचक्रोशीतील नागरिक येथे दशविधी तथा अन्य धार्मिक विधी उरकण्यासाठी येतात. या नागरिकांची सोय व्हावी म्हणून कोटेश्वर येथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे; पण नागरिक स्वत:ची जबाबदारी विसरत असल्याचे दिसते. दशविधीसाठी येणारे नागरिक नदीपात्र प्रदूषित करण्याचे काम करतात. दशविधीसाठी आणलेले साहित्य नदी पात्रातच टाकले जाते. शिवाय खाद्यपर्थांच्या सेवनासाठी वापरलेले प्लास्टिकच्या प्लेटा, द्रोण, ग्लास नदीच्या काठावर वा पाण्यात टाकले जातात. यामुळे उत्तरवाहिनीच्या पाण्यात सर्वत्र प्लास्टिकचा कचरा आढळून येतो. काही नागरिक घाटाच्या काठावर पायºयांजवळ हे साहित्य जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे करीत असताना परिसर अस्वच्छ होत असून प्रदूषण होत आहे.
काही सामाजिक संस्था तथा कोटेश्वर, रोहणी (वसू) व परिसरातील गावांतील युवक नदीपात्र तथा मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे प्रयत्न करतात; पण यात प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे उत्तरवाहिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील नागरिकांसाठी कोटेश्वर हे विविध विधींसाठी प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे; पण त्या सुविधांची देखभाल तथा नदी पात्राची स्वच्छता हे तेथे येणाºया नागरिक, दुकानदार तथा परिसरातील नागरिकांचे कर्तव्य आहे. प्रशासनानेही नदीपात्राचे प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
नदी स्वच्छतेचा पत्ताच नाही
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने नदी स्वच्छता तथा नदी जोड प्रकल्प हाती घेण्याच्या वल्गना केल्या होत्या. गंगा नदीच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांचा खर्चही केला जात आहे; पण हे अभियान देशातील अन्य नद्यांपर्यंत अद्याप पोहोचलेले नाही. यामुळे नदी स्वच्छता अभियान गरजेचे झाले आहे.
प्रशासकीय उदासिनताही कारणीभूत
शासन तथा न्यायालये जलस्त्रोत दूषित होऊ नये म्हणून कठोर भूमिका घेत आहे; पण प्रशासन तथा लोकप्रतिनिधी उदासिन दिसतात. पवनार येथे धाम नदी स्वच्छता मोहीम राबविली; पण तो फार्स ठरला. यानंतर नदी स्वच्छतेची कुठलीही पावले उचलली गेली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
जिल्ह्यातून वाहणाºया वर्धा नदीवर दोन मोठे प्रकल्प आहेत. यात सर्वात मोठा उर्ध्व वर्धा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे तर दुसरा निम्न वर्धा हा मध्यम प्रकल्प आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे नदीचे पाणी अडविले जात असल्याने समोर पुलगाव, विजयगोपाल, कोटेश्वर भागाकडे फारसे पाणी राहत नाही. शिवाय आर्वी ते कोटेश्वर दरम्यान अनेक रेतीघाट आहेत. या रेती घाटांमुळेही नदीचे पात्र धोकादायक स्थितीत आले आहे. परिणामी, पात्रातील पाणी जागोजागी तुंबले असून प्रवाहित नाही. यामुळे नदी पात्रामध्ये टाकला जाणारा कचरा तेथेच साचून राहतो. कोटेश्वर येथेही असाच प्रकार असून प्लास्टिकच्या कचºयाचे पाण्यावर आच्छादन असल्याचाच भास होतो.