२० कोटींतून साकारणार रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:38 PM2017-11-21T23:38:21+5:302017-11-21T23:38:54+5:30
शहरातील रस्त्यांच्या विकासाचे पर्व सध्या सुरू आहे. बॅचलर रोड, शहरातून बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) कडे जाणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले. धुनिवाले मठ ते शिवाजी चौकापर्यंच्या रस्त्याचाही कायापालट करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रस्त्यांच्या विकासाचे पर्व सध्या सुरू आहे. बॅचलर रोड, शहरातून बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) कडे जाणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले. धुनिवाले मठ ते शिवाजी चौकापर्यंच्या रस्त्याचाही कायापालट करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २० कोटी रुपयांतून हा चार पदरी रस्ता साकारला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते विकासावर भर दिला जात आहे. शहरातील धुनिवाले मठ ते पावडे नर्सिंग होम चौकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलावरून बोरगाव व सावंगीकडे उतरणाऱ्या रस्त्यांचेही सिमेंटीकरण केले जात आहे. यानंतर आता महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि तेथून बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले असून कामाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. हा रस्ता चार पदरी सिमेंटचा होत असून यात रस्त्याच्या दुतर्फा नाली, रस्ता दुभाजक आणि पादचारी रस्त्याचाही समावेश राहणार आहे.
या रस्त्याच्या कामाचे कंत्राट कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीमार्फत दर्जेदार रस्त्याची निर्मिती करून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या रस्ता कामावर अभियंत्यांची देखरेख राहणार असून मार्ग प्रशस्त, सुसज्ज व सुंदर करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ता दुभाजकावर पथदिवे लावून प्रकाशाची सोय करण्यात येणार आहे. शहराला ‘स्मार्ट सिटी’चा ‘लूक’ देण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सदर रस्त्याच्या कामामध्ये सुमारे २४ वृक्षांची कटाई करावी लागणार आहे. वृक्ष न कापता रस्त्याचे बांधकाम शक्य नसल्याने नाईलाज म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानक दरम्यान कापलेल्या वृक्षांच्या दहा पट वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचेही अधिकारी सांगतात.
सर्व सिमेंट रस्त्यांची कामे झाल्यानंतर शहर स्वच्छ, सुंदर करण्याकरिता सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी काम दर्जेदार व्हावे म्हणून विभागाने लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
पथदिवे व वृक्षांमुळे शहराचा होणार कायापालट
महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंत चार पदरी रस्त्याच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. यात रस्ता दुभाजकांची निर्मितीही करण्यात येणार असून मधोमध पथदिवे लावण्यात येणार आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा पादचाºयांसाठी मार्ग ठेवण्यात येणार असून वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. २४ वृक्ष कापावे लागणार असल्याने त्याच्या दहा पट वृक्षांची लागवड या मार्गाच्या दुतर्फा करण्यात येणार आहे. पथदिव्यांचा प्रकाश आणि वृक्षांमुळे शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. बांधकाम विभागही प्राकलनाप्रमाणे रस्त्याच्या निर्मितीकडे लक्ष देऊन आहे. नागरिकांना या रस्त्याची प्रतीक्षा असल्याचे दिसते.
दर्जेदार कामांसाठी ‘वॉच’ गरजेचा
शहरात सर्वत्र रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. धुनिवाले मठ ते पावडे नर्सिंग होम चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे; पण या रस्त्यांची निर्मिती दर्जेदार व्हावी म्हणून बांधकाम विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानक, हा रस्ता मुख्य रस्ता राहणार असल्याने या रस्त्याच्या दर्जेदार निर्मितीवर बांधकाम विभागाने ‘वॉच’ ठेवणे गरजेचे राहणार आहे.