रस्ता खोदकामात नळजोडणीची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:06 PM2019-04-19T22:06:10+5:302019-04-19T22:06:56+5:30
आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सोबतच या बाजूने टेलिफोन लाईन, केबल लाईनसुद्धा आहे. असे असताना सर्व्हिसिंगकरिता जागा सोडण्यात आलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका जुना पाणी रस्ता बांधकामाकरिता तब्बल ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत पूर्णत्वास गेले आहे. शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. आता एकेरी रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कामात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे.
खोदकाम करताना नळजोडणीची नासधूस केली जात आहे. याशिवाय भविष्यात टेलिफोन व केबल लाइनच्या दुरुस्तीच्या दृष्टीने जागा सोडण्यात आलेली नसून काम सुरू आहे. यामुळे कालांतराने परत रस्ता फोडण्याची नामुष्की ओढवू शकते. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. यातच शहरात विविध भागांत बांधकामाचा सपाटा सुरू आहे. खोदकामादरम्यान नळजोडणी तोडली जात असल्याने पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मात्र याचा कुठेही विचार केला जात नसल्याचे दिसून येते. टेलिफोन लाईन, केबल लाइन दुरुस्तीकरिता जागा सोडण्यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुधीर दंदे यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
कामाचा दर्जाही सुमार
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्षा लोटत नाही तोच अनेक रस्त्यांना शेकडो भेगा गेल्या आहेत. आर्वी नाका ते बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत. अल्पावधीतच रस्त्यांची डागडुजीही करावी लागली. त्यामुळे बांधकामे करताना ती दर्जेदारच करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
पाणीटंचाई लक्षात घेता बांधकामे थांबवावी
अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. याचाच परिणाम म्हणून शहरात सहा ते सात दिवसांनंतर तर लगतच्या ग्रामीण भागांत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. कुठे ना कुठे दररोज २०० ते २५० फूट बोअरवेल केल्या जात असतानाही पाणी लागेनासे झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. असे असताना नियोजनाच्या अभावात विकासकामांचा सपाटा सुरू आहे. पिण्यासही पाणी मिळेनासे झाले असताना बांधकामांवर पाण्याची उधळपट्टी केली जात आहे. बांधकामे थांबविण्यात यावी, अशीही मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.
एलईडी दिव्याचा खांब कोसळला
कामाचा दर्जा राखला जात नसल्याने अल्पावधीतच पितळ उघडे पडत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एलईडी दिवे लावण्यात आले. यातील एक खांब वाºयाच्या झोताने कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी कामाच्या दर्जाविषयी नागरिकांनी मात्र प्रश्न उपस्थित केला.