बोथली-पांजरा रस्ता मरणाला झाला सस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:20 AM2018-10-06T00:20:38+5:302018-10-06T00:21:01+5:30
नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा उखडलेला रस्ता मरणासाठी सस्ता झाल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बोथली-पांजरा हा दोन किलो मीटर अंतरचा रस्ता जंगलव्याप्त व चढणी-उतरणीचा आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या रस्त्याची पुर्णत: वाट लागली आहे. जंगलव्याप्त परिसरातील या रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोल दऱ्या आहे. तसेच दुर्लक्षामुळे या रस्त्यावरची दगड उघडी पडली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दगडच दिसून येते. हा रस्ता चढणी उतरणीचा असल्याने यावरून वाहन चालविणे जोखमीचे झाले आहे. या दगडी रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.पण, या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहे. या रस्त्याने पांजरा, बोथली येथील शेतकरी- शेतमजूर व शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. रस्ता दुरुस्तीसाठी पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी प्रयत्न चालविले आहे. पण, त्यांच्या प्रयत्नाला कोणती राजकीय परिस्थिती आडवी येते, हे कळायला मार्ग नाही. या मार्गावरुन अवागमण करणाºयांनी वारंवार रस्त्याच्या दुुरुस्तीची मागणी केली. पण, या मागणीकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने परिणामी संबंधित विभागानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे नागरिकांना या दगडमय रस्त्यावरुनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याने पायदळ चालनेच कठीण झाले आहे. पायदळ चालताना दगडावरुन कधी पाय वाकडा पडेल याचा नेम नाही. वाहनचालकाला तर या दगडावरुन सुरक्षीत वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. यातच वाहने घसरुन अपघातही होत आहे.त्यामुळे वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
रोज मरे त्याला कोण रडे!
बोथली-पांजरा हा रस्ता आर्वी तालुक्यात येत असून आर्वीला काँग्रेसचे आमदार अमर काळे व भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे हे दोन्ही लोकप्रतिनिधी विकासाच्या दृष्टीकोणातून सक्षम असल्याचे बोलेले जाते. असे असतानाही या मार्गाची ही दुरावस्था का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे. त्यांच्या या मतदार संघातील रस्त्यापेक्षा जिल्ह्यात दुसरा खराब रस्ताच नसल्याची ओरडही नागरीक करीत आहे. या रस्त्यामुळे वाहन चालकांच्या वाहनाचे आणि शरिराचेही नुकसान होत आहे. वाहनचालकांना पाठीचा व मानक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही लक्ष दिले जात नसल्याने ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था येथील नागरिकांची करुन ठेवली आहे.