जुवाडी फाटा ते आलोडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:32 PM2017-11-21T23:32:36+5:302017-11-21T23:34:37+5:30
जुवाडी फाटा येथून धानोली हे गाव दोन किमी अंतरावर आहे. या दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम उपविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची रहदारी धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : जुवाडी फाटा येथून धानोली हे गाव दोन किमी अंतरावर आहे. या दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम उपविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची रहदारी धोक्यात आली आहे. मागील ५ ते ६ वर्षांत एकदाही रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. यामुळे नागरिक त्रस्त असून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
जुवाडी फाटा ते धानोली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे. दगड व सळाखी उघड्या पडल्या आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या गावात बस जातच नाही. दुचाकी, आॅटो व बैलबंडी एवढी अल्प प्रवासी वाहतूक सुरू आहे. तीन-चार वर्षांपासून रस्ता उखडला असताना दुरूस्तीसाठी कुणीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. ग्रामस्थांनी अनेकदा रस्ता दुरूस्तीची मागणी केली. निवेदने दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. रस्त्याच्या देखभाल, दुरूस्तीचे काम बांधकाम उपविभाग सेलूकडे आहे. उपविभागीय अभियंता रस्त्याची पाहणी करण्यासाठीही येत नाही. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. असे असले तरी बांधकाम उपविभागाला जाग आलेली नाही. याकडे लक्ष देत डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.