मदन उन्नई धरणावरील पथदिवे बंदच
By admin | Published: July 9, 2017 12:44 AM2017-07-09T00:44:00+5:302017-07-09T00:44:00+5:30
मोठा गाजावाजा करीत मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे लावण्यात आले. परंतु, नंतर त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या हे पथदिवे बंद आहेत.
दुरूस्तीकडे दुर्लक्ष : परिसरात असतो काळोख
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : मोठा गाजावाजा करीत मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे लावण्यात आले. परंतु, नंतर त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या हे पथदिवे बंद आहेत. परिणामी, या धरणावर काळोख असतो. संभाव्य धोका लक्षात घेता बंद पथदिव्यांच्या दुरूस्तीची मागणी आहे.
आकोली-आंजी (मोठी) मार्गावरील मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे बसविण्यात आल्याने रात्रीला धरणाचे सौदर्य खुलून दिसायचे. रस्त्याने ये-जा करणारा रात्री दोन मिनीट थांबून ते दृष्य न्याहारीत. पण, ते नेत्र सुख अल्पावधीचे ठरले. काही तांत्रिक बिघाडामुळे हे पथदिवे बंद पडले. परंतु, बंद पथदिवे सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. त्याकडे संबंधी विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची परिसरात ओरड आहे.
धरण परिसराची शोभा वाढावी, धरण क्षेत्रातून होणारी मुरूम, मातीची चोरी व अवैध मासेमारी थांबावी या हेतूने पाटबंधारे विभागाने धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पथदिवे बसविले होते. त्यामुळे अवैध चोरी व अवैध कृत्यांना आळा बसला होता. मात्र, रात्रीला येथे काळोख राहत असल्याने गैर कृत्यांना उत आले आहे. या गलथान कारभाराचा परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे शेतकरी विलास डंभारे सांगतात. संभाव्य धोका लक्षात घेता तात्काळ बंद पथदिवे दुरूस्तीची मागणी आहे.