बिल्डकॉनच्या विरोधात रत्नापूरवासी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:09 PM2018-10-15T22:09:13+5:302018-10-15T22:09:57+5:30
चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले. यावेळी बिल्डकॉन कंपनीचे वाहने अडवून कामही बंद पाडल्याने दोन दिवसात काम करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वर्धा ते यवतमाळ या महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यालगत असलेले रत्नापूर हे गांव दोन भागात विभागाले असून चौपदरी रस्त्याच्या एका बाजुला जुन्या वस्तीत पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तर दुसऱ्या बाजुला नवीन वस्तीत पाण्याची टाकी आहे. या टाकीत विहिरीवरुन पाणी जमा होतात. त्यानंतर गावाला पुरवठा केल्या जातो. पाणी पुरवठ्याची ही पाईपलाईन चौपदरी रस्त्यातून आरपार गेली असल्याने या रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामात ती वारंवार फुटत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने बांधकाम करणाऱ्या बिल्डकॉन कंपनीने दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शेतीच्या कामाच्या दिवसांमध्ये पाण्याकरिता महिलांना भटकंती करावी लागत असल्याने गावात संताप व्यक्त होत आहे. गावातील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सूचना करुनही कंपनीने लक्ष दिले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासूनच या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. कंपनीचे टिप्पर, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहने अडवून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या कंपनीकडून नियम पायदळी तुडविले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. कंपनीकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशासनामध्येही हतबलता पाहवयास मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. या आंदोलनात उपसरपंच शालीक मांगुळकर, ग्रा.प. सदस्य राधा कुडमथे, जयमाला खडसे, रंजना तोडासे, उमेश कुमरे, माजी सरपंच बाबाराव शेंदरे, शामराव खडसे, नंदा मांगुळकर व गावकºयांनी सहभाग घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले.