एसी वाहनातूनच रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:29 PM2018-05-10T23:29:42+5:302018-05-10T23:29:42+5:30
धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला. यानंतर गुरूवारी बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास डेबळवार यांनी वर्धा गाठत बॅचलर रोडच्या कामाच्या पाहणीचा ‘फार्स’ केला. सदर अधिकाऱ्यांच्या चमूने एसी कारमध्ये बसूनच बॅचलर रोडच्या कामाची गुणवत्ता तपासली, हे विशेष!
नागपूर येथून वर्धेत दुपारी २ वाजता दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या चमूने धुनिवाले चौक येथून बॅचलर रोड मार्गे पावडे नर्सिंग होम चौक गाठला. यानंतर हा ताफा यू-टर्न घेत पुन्हा आर्वी नाका, धुनिवाले चौकाच्या दिशेने निघाला; पण मधेच हा ताफा न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजसमोर थांबला. येथून यू-टर्न घेत दुपारी २.३० वाजता माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या मुलाच्या दवाखान्यासमोर थांबला. येथे सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास डेबळवार यांच्याशी आ.डॉ. पंकज भोयर, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे तसेच परिसरातील काही नागरिकांनी चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे यांनी बॅचलर रोड परिसरात तयार होत असलेली सिमेंट नाली, सिमेंट रस्ता, दुभाजक, झालेल्या बांधकामावर मजबुतीकरणासाठी होत असलेला पाण्याचा कमी वापर, रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब आदींबाबत डेबळवार यांना माहिती दिली. शिवाय गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणीही केली. मुख्य अभियंता डेबळवार यांच्यासोबत चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे उपस्थित होते.
चर्चेच्या वेळी वर्धेचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, अभियंता मून, न.प. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुधीर फरसोले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, न.प.चे माजी बांधकाम सभापती निलेश किटे आदी उपस्थित होते.
१२.३० ची वेळ असताना तब्बल २ वाजता ‘एन्ट्री’
दुपारी १२.३० वाजता येणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्धा शहरात दाखल झाले. इतकेच नव्हे तर बॅचलर रोडवर प्रतीक्षेत असलेल्या आ.डॉ. पंकज भोयर, माजी आमदार डायगव्हाणे यांच्याकडे बघूनही न बघितल्याचे दर्शवित या अधिकाºयांनी थेट आर्वी नाका चौक तथा पावडे नर्सिंग होम चौक गाठला. येथून यू-टर्न घेऊन पुन्हा एकदा सदर अधिकारी न्यू आर्टस् महाविद्यालयापर्यंत गेले. तब्बल २० मिनीट चाललेल्या या प्रकारात आजी-माजी आमदारांना अधिकाºयांची प्रतीक्षा करावी लागली. शिवाय एसी कारमधूनच पाहणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
पाहणीच्या नावाखाली पलायनच
आजी-माजी आमदारांशी चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या चमूला पत्रकारांनी पाहणी दरम्यान काय त्रूटी आढळल्या, असा प्रश्न केला असता अद्याप पाहणी करायची असल्याचे मुख्य अभियंता डेबळवार यांनी सांगितले. चर्चेनंतर पाहणीच्या नावावर आजी-माजी आमदारांच्या तावडीतून सुटका करून घेत अधिकाऱ्यांनी थेट विश्रामगृह गाठले होते; पण त्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
वीज खांब हटविण्याबाबत घेतली माहिती
चर्चेत मुख्य अभियंता डेबळवार यांनी रस्त्याचे अर्धेधिक काम झालेल्या धंतोली चौक ते आर्वी नाका चौक दरम्यानचे विद्युत खांब काढण्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी धंतोली चौक ते आर्वी नाका चौक दरम्यान भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम झाले आहे. आर्वी नाका ते धुनिवाले चौक मार्गावर भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम नालीचे काम झाल्यानंतर केले जाईल. सदर विद्युत खांब न.प. प्रशासनाने काढून घ्यावेत, असे सांगितले.
नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असल्याने आपण पूर्वीच माजी आमदार डायगव्हाणे यांच्या मुलाच्या दवाखान्याजवळ पोहोचलो होतो. सदर अधिकारी बाहेर जिल्ह्यातील असल्याने व त्यांच्या वाहनात स्थानिक अधिकारी नसल्याने ते आपण उभ्या असलेल्या जागेवर थेट पोहोचू शकले नाही. या प्रकाराला ताटकळत ठेवल्याचा प्रकार म्हणता येणार नाही.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.