वनजमिनीवर रस्ता करून रेतीची वाहतूक

By admin | Published: April 19, 2015 01:47 AM2015-04-19T01:47:44+5:302015-04-19T01:47:44+5:30

रेतीघाटांचे लिलाव, अतिरेकी उपसा, नियम पायदळी तुडवून होणारी रेतीची वाहतूक या प्रकारामुळे जिल्हा ढवळून निघत आहे़

Road transport by way of Vanzamin | वनजमिनीवर रस्ता करून रेतीची वाहतूक

वनजमिनीवर रस्ता करून रेतीची वाहतूक

Next

प्रशांत हेलोंडे वर्धा
रेतीघाटांचे लिलाव, अतिरेकी उपसा, नियम पायदळी तुडवून होणारी रेतीची वाहतूक या प्रकारामुळे जिल्हा ढवळून निघत आहे़ आता आष्टी तालुक्यात रेतीच्या वाहतुकीसाठी थेट वन जमिनीचाच वापर करण्यात येत आहे़ यासाठी खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला़ पाहणीसाठी गेलेल्या अकिधाऱ्यांना हा प्रकार दिसताच वनविभागाने दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले़ या कारवाईमुळे रेतीमाफीयांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे़
जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले़ यात आष्टी तालुक्यातील घाटांचेही लिलाव झाले़ यातच वाघोली, इस्माईलपूर शिवारात बुधवारी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पाहणी करण्यास गेले होते. तेथील झुडपी जंगल सर्व्हे क्रमांक २७ व ९ मध्ये इस्माईलपूर व वाघोलीच्या शिवेतून शेतकऱ्यांना शेतात आवागमनासाठी रस्ता आहे़ यात झुडपी जंगल असून शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता आहे. या परिसरात वाहने फसून असल्याचे अधिकाऱ्यांना निदर्शनास आले. ट्रक क्ऱ एम़एच़ ३१/९६६२, ट्रॅक्टर क्ऱ एम़एच़ ३२ क्यू़ ४७४७ व ट्रक क्ऱ एम़एच़ ३२ सी़ ३४८२ ही तीन वाहने रस्त्यात रूतून असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी ट्रक कुठून येतात, याची पाहणी केली असता पूढे रेतीघाट सुरू असल्याचे दिसून आले़ चौकशीअंती अनिल मानकर रा. आष्टी, विवेक ठाकरे रा. तळेगाव यांच्यासह चार ते पाच जणांनी रेतीघाटाचे कंत्राट घेतल्याची माहिती प्राप्त झाली़ रेती वाहतूक व्हावी म्हणून त्यांनी रस्त्याचे सपाटीकरण केले़ यासाठी झाडे-झुडपे काढल्याचा प्रकार उजेडात आला़ यावरून वनजमिनीवरील रस्ता साफ करणे, अवैध वाहतूक करणे यात दोषी आढळल्याने मानकर व ठाकरे या दोघांविरूद्ध भारतीय वनसंवर्धन अधिनियम १९८० व भारतीय वन अधिनियम १९२७ कायद्यान्वये ६२/१२ अन्वये प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास वन परिक्षेत्र अधिकारी परिहार करीत आहे़ आष्टी तालुक्यातील बहुतांश घाटधारक मनमानी कारभार करीत अतिरेकी रेतीचा उपसा करीत असल्याचेही वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले़ यामुळे अन्य घाट व झुडपी जंगलांचीही पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ वाघोली, इस्माईलपूर शिवारात झालेल्या या कारवाईमुळे अन्य घाट धारकांतही धास्ती पसरली आहे़ महसूल आणि खनिकर्म विभाग मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ शासनाचे नियम पाळले जात नसल्याने संबधित विभागांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
मुख्य घाटधारक अद्याप कारवाईपासून अलिप्तच
इस्माईलपूर रेतीघाट तिवसा येथील अंबुलकर नामक इसमाने घेतल्याची माहिती आहे़ सदर घाट ज्या व्यक्तीच्या नावाने आहे, त्याच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल करणे अनिवार्य होते; पण तसे झाले नाही़ सदर इसम अद्याप कारवाईपासून अलिप्तच आहे़
वन संवर्धन कायदा १९८० अन्वये दाखल गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत़ यामुळे यात सदर घाट धारकांची वाहने जप्त होणे अपेक्षित होते; पण तसेही झाले नाही़ शिवाय कारवाईही विलंबाने करण्यात आली़ यामुळे वन विभागाच्या एकूण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
या कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील झुडपी जंगलालगत असलेल्या अन्य रेती घाटांची चौकशी होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ सर्व विभागाने याची दखल घेत सखोल चौकशी करणे गरजेचे झाले आहे़
झुडपी जंगलात रेतीसाठी खोदकाम
वनविभागाच्या राखीव झुडपी जमिनीतून रेतीमाफीयांनी खोदकाम केले आहे़ काही अंतरापर्यंत शेतातून रस्ता खोदला आहे़ शेतकऱ्यांना धमकावत ही कामे केली ंजात आहे़ शिवाय वनविभागाची परवानगी न घेताच हे खोदकाम करण्यात आले़ या प्रकरणी शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर कारवाईचे फास आवळण्यात आले़ अशाच धमकीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्येही असंतोष पसरला आहे़ सदर प्रकरणाच्या चौकशीत या बाबींचाही उहापोह करण्याची मागणी होत आहे़

Web Title: Road transport by way of Vanzamin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.