पाईप टाकून शेतकऱ्यांनीच केली रस्त्याची दुरूस्ती
By admin | Published: July 2, 2017 12:49 AM2017-07-02T00:49:55+5:302017-07-02T00:49:55+5:30
कालव्याच्या कामांमुळे चिकणी ते पडेगाव पांदण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली.
चिकणी ते पडेगाव पांदण रस्ता : प्रशासनाने केले दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : कालव्याच्या कामांमुळे चिकणी ते पडेगाव पांदण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. संबंधित यंत्रणेला शेतकऱ्यांनी रस्ता दुरूस्तीची मागणी केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, शेतकऱ्यांनीच पाईप टाकून रस्त्याची दुरूस्ती केली.
चिकणी, पडेगाव शिवारात कालव्यांची कामे सुरू होती. सध्या पावसामुळे कामे थांबली असली तरी साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे पांदण रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शेतकऱ्यांनी रस्त्यावर सिमेंट पाईप टाकण्याची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली; पण त्याचा उपयोग झाला नाही. यामुळे स्वत: सिमेंट पाईप आणून रस्त्याची दुरूस्ती केली. यामुळे पाणी वाहून जात असून रस्ता रहदारीस योग्य झाला आहे.
ऐन हंगामात रहदारी होती धोक्यात
खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहेत. पेरणी, डवरणी आदी कामे सुरू असताना शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ताच दुरवस्थेत होता. याबाबत मागणी करूनही रस्ता दुरूस्त करून दिला जात नसल्याने नाईलाज म्हणून शेतकऱ्यांनीच पाईप खरेदी करीत रस्त्याची दुरूस्ती केली. आपली अडचण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ही गांधीगिरी केली.
सदर शिवपांदण रस्त्यावर चिकणी, पडेगाव या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीची वहिवाट करण्याचा हा मुख्य रस्ता होता. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ये-जा करणे कठीण होते. दुरूस्ती महत्त्वाची होती म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सिमेंट पाईप टाकून रस्ता दुरूस्त केला.
- इंद्रपाल नेहारे, शेतकरी पडेगाव.