रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या रांगा

By admin | Published: September 11, 2016 12:41 AM2016-09-11T00:41:19+5:302016-09-11T00:41:19+5:30

शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत.

Roads of heavy vehicles on the road side | रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या रांगा

रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या रांगा

Next

अपघाताचा धोका : वाहन दुरूस्तीच्या दुकानांसमोरच होते गर्दी
वर्धा : शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या या दुकानांच्या समोर ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर यासह अन्य मालवाहू वाहने उभी असतात. या वाहनांमुळे रस्ता संकुचित होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुकाने हटवून कारागिरांना बेरोजगार करू नये; पण किमान रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी सामान्यांतून होत आहे.
शहरातील ‘सिव्हील लाईन एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरती चौक ते विश्राम गृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सारखी वर्दळ असते. शिवाय पोस्ट आॅफीस चौक ते आरती चौक या मार्गाने बसेसची रहदारी सुरू असते. यातील नगर परिषद चौकामध्ये रस्त्याच्या कडेला काही वाहने दुरूस्ती करणाऱ्याची दुकाने आहेत. नगर परिषदेच्या जागेवर असलेली ही दुकाने वाहतुकीला अडथळा ठरत नसली तरी त्यांच्या दुकानांसमोर वा दुरूस्तीसाठी उभी राहणारी अवजड वाहने मात्र अपघातास कारणीभूत ठरत आहेत. पेट्रोल पंपाच्या मागील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शनिवारी ट्रक उभे होते. यामुळे समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाही. शिवाय चौकामध्येही काही वाहने उभी करण्यात आली होती. या प्रकारामुळे अपघाताचा धोका बळावला होता.
नगर परिषद कार्यालय असलेल्या या चोकात यापूर्वीही बरेच अपघात झाले आहे. अपघाताचा धोका ओळखून मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात आले; पण यामुळे केवळ वाहनांची गती कमी झाली. आजही अपघात होतातच. वाहन दुरूस्तीची दुकाने रस्त्याच्या कडेला असल्याने नादुरूस्त वाहने रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर वा परिसरात उभी केली जातात. दुरूस्तीला विलंब झाल्यास ही वाहने दोन-दोन दिवस तेथेच उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत किमान रस्त्यावरील अवजड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांची असते वर्दळ
आरती चौक ते विश्रामगृह याच मार्गावर यशवंत महाविद्यालय, सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. यामुळे या मार्गावर नागरिक, विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सकाळपासून विद्यार्थ्यांचीच अधिक गर्दी असते. याच मार्गावर रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही दुचाकी वाहनांना अधिक धोका असतो.
आरती चौकातील पेट्रोल पंपाच्या मागे काही ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व अन्य जड वाहनांच्या दुरूस्तीची दुकाने आहेत. ही दुकाने रस्त्यावर नसली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी त्यांच्या दुकानांसमोर होणारी वाहनांची गर्दी अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
या दुकानदारांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार करणे, हा कुणाचाही हेतू नाही; पण किमान सदर दुकानदारांनी वाहने अन्यत्र उभी करण्याच्या सूचना कराव्या, अशी अपेक्षाही सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Roads of heavy vehicles on the road side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.