वर्धा: गर्दी टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्ते केले सील, शिथिलतेच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलपंप, बँकांत गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:29 PM2021-05-18T15:29:28+5:302021-05-18T15:32:05+5:30
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे. तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहेत.
वर्धा - दहा दिवसांच्या कठोर लॉकडाऊननंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागात थोडी शिथिलता मिळाली. पण याच शिथिलतेच्या पहिल्या दिवशी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठेतील रस्ते सील करण्यात आले आहेत. तरी मंगळवारी पेट्रोलपंप आणि बँकांमध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळाली.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे. तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहेत. पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा नगरपालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठेतील प्रमुख रस्ते बाबू बांधून सील केले आहेत. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळता आली, असे असले तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती.