रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

By admin | Published: March 21, 2017 01:18 AM2017-03-21T01:18:53+5:302017-03-21T01:18:53+5:30

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले.

Roads in the river bank for sand transport | रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

Next

नियमांना बगल : नैसर्गिक पात्र बदलण्याचा धोका
वर्धा : जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. शिवाय घाटधारकांनीही नियमांचे पालन करीत रेतीचा उपसा व वाहतूक करावे, असे निर्देश देण्यात आले; पण कुठेही नियमांचे पालन होत नाही. वडगाव (पांडे) घाट क्र. एक येथे नदी पात्रातच वाहनांसाठी रस्त्यांची निर्मिती केली आहे. परिणामी, वर्धा नदीचे पात्रच धोक्यात आले आहे.
आठ तालुक्यांमध्ये वर्धा, यशोदा, वणा आदी नदीपात्रातील अनेक रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील वाळू उपस्यासह वाहतुकीकरिता काही नियम देण्यात आले; पण बहुतांश घाटांवर नियमांची पायमल्ली होत आहे. घाटांतून वाळूची वाहतूक करण्याकरिता थेट नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रात रस्ते तयार करून नदीच्या दोन्ही बाजूला रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. रस्त्यांची निर्मिती करताना पात्रातीलच रेतीचा वापर होतो; पण त्यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांमुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वडगाव (पांडे) येथील घाट क्र. एक व दोनचे लिलाव झालेत. या घाटांवर जाण्याकरिता वडगाव गावाच्या रस्त्याचा वापर होतो. परिणामी, रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अल्पावधित दुरवस्था होते. सध्या शासनाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; पण रस्त्यावर डांबर कमी आणि आॅईलचे प्रमाणच अधिक दिसते. यामुळे रेतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याचीही अल्पावधीतच वाताहत होणार, असे दिसते. शिवाय नदीपात्रापर्यंत ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर ही वाहने नेली जात आहे. परिणामी, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वडगाव (पांडे) येथे तर खड्डेमय रस्ता समतल करण्यासाठी एक जेसीबीच घाटधारकाने ठेवला आहे. या जेसीबीद्वारे रस्ता समतल केला जातो. यामुळे ग्रामस्थांतूनही ओरड होत नसल्याचे दिसून आले.
या प्रकारातून रेती उपसा आणि वाहतुकीच्या नियमांची मात्र धूळधान केली जात असल्याचेच पाहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

कालव्याच्या भिंतीवरून होते जड वाहतूक
आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर), वडगाव शिवारात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कालव्याच्या भिंतीवरून केली जात असल्याचे निदर्शनास आले. यात वाळू भरलेले ट्रक तसेच ट्रॅक्टरही कालव्याच्या भिंतीवरूनच धावत असल्याने कालव्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरा पर्यायी रस्ता करण्याऐवजी हा प्रकार सर्रास घडणारा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाराही ठरत आहे.

वाहने फसून होतात अपघात
नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याने जड वाहने थेट पात्रात शिरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रेती भरल्यानंतर वाहने काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे करीत असताना अनेकदा ट्रॅक्टर फसतात. परिणामी, अपघातांना सामोरे जावे लागते. निमगव्हाण घाटावर असा अपघात झाला. तत्पूर्वी एका घाटात पोकलॅण्ड पात्रात बुडाला. या घटनांमुळे चालक, मजुरांना जीव गमवावा लागतो. असाच रेती भरलेला ट्रॅक्टर वडगाव एकमध्ये पात्रात फसून असल्याचे दिसून आले.

Web Title: Roads in the river bank for sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.