पावसामुळे रस्ते उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:33 AM2017-07-20T00:33:27+5:302017-07-20T00:33:27+5:30
बहुप्रतीक्षित पावसाचे आगमन झाल्यावर शहरातील रस्त्यांचे अंतरंग उघडे पडल्याने रस्ता बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
खड्ड्यांची मालिका : चिखलामुळे वाहने घसरतात
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : बहुप्रतीक्षित पावसाचे आगमन झाल्यावर शहरातील रस्त्यांचे अंतरंग उघडे पडल्याने रस्ता बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागते. चिखलावरून वाहने घसरल्याने दुचाकी चालकांना अपघात झाल्याच्या घटनांतही वाढ होत आहे.
शहरातील रस्ते पाहता रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडतो. शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या पेट्रोलपंप ते विठोबा चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी जमा झाले आहे. अनेकदा वाहनधारक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात घसरुन पडतात. तर खड्ड्यातील साचलेले पाणी कपड्यावर उडू नये यासाठी वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना खड्ड्यातील पाणी अंगावर उडणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे सदर रस्ते नागरिकांच्या सुविधेकरिता तयार केले अथवा समस्येत भर टाकण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून रस्त्यालगत टाकलेला कचरा सडल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रस्त्याने मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. रस्त्यावरचे खड्डे चुकवावे की दुर्गंधीपासून बचाव करावा यामुळे नागरिक बुचकळ्यात पडतात. पेट्रोलपंप ते विठोबा चौकापर्यंतचा रस्ता शहराचा प्रवेशमार्ग आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळ असते. बसस्थानक, शाळा, महाविद्यालये, बाजार ओळ, शासकीय कार्यालयाकडे जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. वाहतुकीकरिता अत्यंत महत्वाच्या असलेल्या रस्त्याची पावसाळ्यात अवस्था तेवढीच वाईट झाल्याचे पाहायला मिळते. खड्ड्यांमुळे तर रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
यास विठोबा चौक ते तुकडोजी पुतळा चौक हा रस्ता महत्वाचा असून येथे अनेक खड्डे पडले आहे. रस्त्याची सुरुवातच खड्ड्यांनी होते. कन्या शाळेजवळील चौकात खड्डे पडले आहेत. रिठे कॉलनीतील रस्त्यांवर तर चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे घसरुन पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दोन वर्षांपासून येथील नागरिकांनी तक्रारी दिल्या मात्र पावसाळा आला तरी डागडुजी केली नाही. श्रीराम टॉकीजकडून मस्जीदकडे जाणारा मार्ग चिखलमय झाला आहे. नगर प्रशासन अद्याप या समस्यांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना कराव लागतो.
यासह तुकडोजी वॉर्ड, मोहता बगीचा परिसरातील रस्त्यांची हीच स्थिती आहे. रस्त्यालगत टाकलेल्या मुरूम व मातीच्या ढिगाऱ्यांवरून चालताना नागरिकांना अडचण येत आहे. इंदिरा गांधी वॉर्ड, नन्नाशा वॉर्ड, या परिसरात कच्चे रस्ते असल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांची सफाई केली जात नाही. सेन्ट जॉन कॉन्व्हेंट समोरील नाली गाळाने भरली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहुन जाण्यास अडचण येते. परिणामी ररस्त्यावर पाणी साचुन चिखल होतो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.