गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी वर्ध्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:32 PM2019-06-28T15:32:36+5:302019-06-28T15:33:02+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीक साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील तीनही सदस्य व एक महिला तरुण असून ते उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर महिला ही दिल्ली येथील रहिवासी आहे. या टोळीतील सदस्यांनी सुमारे १३ गुन्ह्याची कबुली लोहमार्ग पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
कन्हैय्या सुकई यादव (२३), मनोजकुमार रामनरेश सिंग (२२), सोनू रामअभिलाश शुक्ला (२४) व सीमा मनोजकुमार सिंग (२२) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा लोहमार्ग पोलिसांनी गस्ती दरम्यान दोन संशयास्पद तरुणांना ताब्यात घेतले. अधिक विचापूस केली असता त्यांनी प्रवाशांना गुंगीचे औषध खाद्यपदार्थात देऊन त्यांच्याकडील साहित्य आम्ही पळवित असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर कन्हैय्या व सोनू याला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची सात दिवसीय पोलीस कोठडी ठोठावली. याच पोलीस कोठडीदरम्यान वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याची एक चमू आरोपी कन्हैय्या याला सोबत घेऊन या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या मनोजकुमार याचा शोध घेण्यासाठी दिल्ली रवाना झाली. कन्हैय्याने दिलेल्या माहितीवरून मनोजकुमार याला ताब्यात घेऊन सदर पोलीस चमू वर्धेच्या दिशेने परतीचा प्रवास करीत असताना मध्यप्रदेशातील तिगाव नजीकच्या रेल्वे स्थानक येण्यापूर्वी कन्हैय्या आणि मनोजकुमार यांनी वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु, त्यानंतर वर्धा लोहमार्ग पोलिसांनी नव्या जोमाने कामाला लागून फरार झालेल्या कन्हैय्या यादव आणि मनोजकुमार सिंग यांना जयपूर येथून अटक केली. विशेष म्हणजे या दोघांनी मित्राच्या घरी जयपूर येथे आश्रय घेतला होता. दरम्यानच्या तपासात या टोळीला सिमा मनोजकुमार सिंग ही महिलाही सहकार्य करीत असल्याचे पुढे आल्याने तिलाही वर्धा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सदर चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांनी सुमारे १३ गुन्ह्याची कबुली वर्धा लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीसचे पोलीस अधीक्षक अमोक गावकर, राजपुत, वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन वडते यांच्या मार्गदर्शनात ढोणेकर, हनवते, लोटावार यांनी केली.
सोनूची रवानगी न्यायालयीन कोठडीत
या चोरट्यांच्या टोळीतील आरोपी असलेल्या सोनू रामअभिलाश शुक्ला याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर कन्हैय्या आणि मनोज हे पोलीस कोठडीत आहेत.