सोन्याच्या नावावर लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 09:55 PM2018-09-27T21:55:56+5:302018-09-27T21:57:26+5:30
सोन्याच्या आकर्षक वस्तू देण्याची बतावणी करुन; वस्तू खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघांना अटक केली आहे. संजय उर्फ बाळू महादेव जाधव (३६), अनिल साधुसिंग राठोड (३२) दोघेही रा. रामगाव, जि.यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोन्याच्या आकर्षक वस्तू देण्याची बतावणी करुन; वस्तू खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघांना अटक केली आहे.
संजय उर्फ बाळू महादेव जाधव (३६), अनिल साधुसिंग राठोड (३२) दोघेही रा. रामगाव, जि.यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ आॅगस्टला विलास शिवाजी डांगे (४१) रा. संधिनाथ वाडी, वाई-सातारा यांना सोन्याचे अॅन्टीक पीस दाखवितो म्हणून आरोपी संजय जाधव व त्याच्या सहकाºयांनी देवळी तालुक्याच्या काजळसरा चौरस्ता येथे बोलाविले. त्यानुसार विलास डांगे तेथे आले असता सर्व आरोपींनी त्यांच्या जवळील ५० हजार रुपये रोख व एक मोबाईल असा एकूण ६५ हजाराचा ऐवज हिसकावून पोबारा केला, अशी तक्रार डांगे यांनी देवळी पोलिसांत दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान कारंजा (लाड) येथेही अशीच फसवणूक करण्याची रणनिती आखल्याची माहिती पोलीसांच्या पथकाला मिळाली. पोलीसांनी कारंजा गाठून एम.एच.३७ ए ३९३७ कारसह बाळू जाधव व अनिल राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हाची कबुली दिली असून त्यांच्याकडून मोबाईल व १४,६०० रुपये रोख आणि ४ लाखाची कार, असा एकूण ४ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.