मौल्यवान साहित्य पळविणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:52 PM2018-08-06T21:52:26+5:302018-08-06T21:52:45+5:30
गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सरीता मधु उपाध्ये (२०), मनिषा आतीश शेंडे (२४), रंजीता सनी उर्फ विशाल पाथरे (४२), लक्ष्मी अजीत बोडखे, (२६) व शेख फिरोज शेख बशीर (३६) सर्व रा. चितोडा, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार महिला हिंगणघाट येथून आॅटोत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन समुद्रपूर मार्ग वर्धाकडे येत असल्याची माहिती वर्धा शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे शहर ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी गांधी चौकात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान एका वाहनात काही महिला आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला तोरा दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेला आॅटो असा एकूण २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी पोलिसांना हिंगणघाट व वर्धा येथील एकूण दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार मदने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, दिनेश तुमाने, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड, अमरदीप पाटील यांनी केली.