पिस्टलच्या धाकावर मुत्तूट फिनकॉर्पमध्ये दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:16+5:30

कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले.  एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात असल्याचे पाहून दीपिका हिंगे हिने त्यास विचारणा केली असता दरोडेखोराने दीपिकाच्या गळ्यावर चाकू लावून पिस्टलचा धाक दाखवून इतर तिघांना आधी सोने आणि नंतर रोख आणण्यास सांगितले.

Robbery at Muthoot Fincorp at gunpoint | पिस्टलच्या धाकावर मुत्तूट फिनकॉर्पमध्ये दरोडा

पिस्टलच्या धाकावर मुत्तूट फिनकॉर्पमध्ये दरोडा

Next
ठळक मुद्देगुरुवारी सकाळचा थरार : तीन लाख रुपयांच्या रोखेसह अडीच किलो सोने पळवून केला घटनास्थळाहून पाेबारा

  लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या मुत्तूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर भल्या सकाळीच सशस्त्र दरोडा पडला. गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरोडेखोराने महिला कर्मचाऱ्यावर पिस्टल रोखून तसेच चाकूचा धाक दाखवून अडीच किलो सोने आणि ३ लाख रुपयांची रोख असा एकूण अंदाजे ६६ लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली. 
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.५९ वाजताच्या सुमारास मुत्तूट फायनान्स कंपनीचे कार्यालय उघडले. दोन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी कार्यालयात गेले. ९ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती तोंडाला मास्क आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून कुरिअर बॉय असल्याचे सांगून फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आला. यावेळी कार्यालयात अक्षय खेरडे, महेश श्रीरंगे, दीपिका हिंगे आणि स्नेहल नामक कर्मचारी उपस्थित होते. कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले.  एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात असल्याचे पाहून दीपिका हिंगे हिने त्यास विचारणा केली असता दरोडेखोराने दीपिकाच्या गळ्यावर चाकू लावून पिस्टलचा धाक दाखवून इतर तिघांना आधी सोने आणि नंतर रोख आणण्यास सांगितले. दरोडेखोर एकटाच असल्याने त्याने आपल्या सोबत बॅग आणली होती. त्या बॅगमध्ये त्याने सोने आणि रोख टाकून कर्मचाऱ्यांना डांबून तेथून पळ काढला. याप्रकरणी ग्राहक प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले अक्षय खेरडे याने  शहर पोलिसात तक्रार दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, ठाणेदार धनाजी जळक दाखल झाले. 
पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरोडेखोराच्या शोधात गुन्हे शाखेची चमू, शहर पोलीस ठाण्याची चमू रवाना झाली असून आरोपी पोलिसांच्या रडारवर           आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
या प्रकरणात पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर झाला कैद 
फायनान्स कंपनीच्या कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असून त्याला पकडण्यासाठी चार ते पाच पोलीस पथक रवाना झाले आहे. त्यामुळे लवकरच दरोडेखोरास अटक करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी सांगितले. 

दरोड्याचा घटनाक्रम मिनिट टू मिनिट...

८.५९ वाजता कार्यालय उघडले.
९ वाजता दरोडेखोर कुरिअर बॉय म्हणून कार्यालयात आला.
९.५ वाजता महिला कर्मचाऱ्याच्या गळ्यावर  चाकू लावला.
९.१५ वाजता कर्मचाऱ्यांना खोलीत डांबले.
९.१७ वाजता दरोडेखोर ऐवज घेऊन पळाला. 
९.१० वाजता सफाई कर्मचारी कार्यालयात दाखल झाली.
९.२० वाजता पोलिसांना फोन केला.
९.२५ वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 

कर्मचाऱ्यांना लॉकर रुममध्ये डांबले
दरोडेखोराने जवळील पिस्टल काढून महिला कर्मचारी दीपिका हिंगे हिच्या गळ्यावर चाकू लावून इतर कर्मचाऱ्यांना सोने आणि रोख बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांच्याजवळील मोबाईल आणि पर्स बाहेर काढून चौघाही कर्मचाऱ्यांना लॉकररुममध्ये डांबून ऐवज भरलेली बॅग घेऊन तेथून पळ काढला. 
महिला सफाई कर्मचाऱ्याने उघडला दरवाजा
९.१० मिनिटाने सफाई कर्मचारी ललिताबाई या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आल्या असता आरडाओरड ऐकू आली. त्यांनी लगेच कार्यालयात जावून पाहिले असता सर्व कर्मचारी लॉकररुममध्ये डांबून असल्याचे पाहिले त्यांनी तत्काळ चाबीने कुलूप उघडले. दरम्यान अक्षय खेरडे याने वरच्या माळ्यावर श्रीराम फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

ठसे तज्ज्ञ, श्वान पथक दाखल
घटनेची माहिती शहरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. भल्या सकाळी दरोडा पडल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

पैसे भरलेली बॅग घेतल्यानंतर दरोडेखोराने कर्मचारी महिलेची दुचाकीही पळविली
दरोडेखोराने ऐवज भरलेली थैली घेतल्यावर महिला कर्मचारी दीपिका हिंगे हिच्यावर पिस्टल रोखून तिला दुचाकीची चावी मागितली. चोरट्याने दुचाकीची चावी घेत दीपिकाच्या एम.एच.३२ झेड.०१७० क्रमांकाच्या दुचाकीने तेथून पळ काढला. दरोडेखोराला दीपिकाजवळ दुचाकी आहे, हे कसे माहिती? दरोडेखोर फायनान्स कंपनीबाहेर दबा धरून बसला होता का, त्याच्यासोबत आणखी सहकारी होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत.  

 

Web Title: Robbery at Muthoot Fincorp at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी