घरफोड्या करणारे चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:59 PM2018-10-28T23:59:25+5:302018-10-29T00:00:47+5:30
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक भामटीपुरा भागातील अनिल गोपालदास भैया यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. तपासाचे सूत्र स्विकारताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालींना गती देत सुरूवातीला सिद्धार्थनगर येथील रहिवासी असलेल्या राकेश सकट याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवीन मुलायमसिंग धूर्वे (२०), पंकज धू्रव लोंढे (२६) व सचीन युवराज लोंढे (२०) सर्व रा. अशोकनगर यांना ताब्यात घेतले. या चारही आरोपींनी संगणमत करून बोरगांव (मेघे), भामटीपूरा, अशोकनगर, सिध्दार्थनगर, पंचवटीनगर आदी भागात एकूण नऊ घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे ७ लाख २९ हजार रुपये किंमतीचे २४३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ हजार ५०० रुपये किंमतीचे १५० ग्रॅमचे चांदीचे दागिने, पाच मोबाईल असा एकूण ७ लाख ५३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखडे, सहा. फौजदार नामदेव किटे, उदयसींग बारवाल, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमल, हरीदास काकड, परवेज खान, वैभव कट्टोजवार, अमीत शुक्ला, सचिन खैरकार, अमर लाखे, आनंद भस्मे, तुषार भूते आदींनी केली.
शहरासह रामनगर पोलिसांच्या हद्दीत केले काम फत्ते
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांनी एकूण नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यापैकी एक घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तब्बल आठ घटनास्थळ वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चोरट्यांच्या धाडसाबाबत उलट-सुलट चर्चा होत असल्याचे दिसून येते. या चारटी चोरट्यांपासून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ताब्यातील आरोपींना वर्धा शहर पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
दाखल गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाकडे एसपींचे लक्ष
वर्धा शहर व रामनगर पोलीस स्टेशन परीसरातील घरफोडीचे प्रमाण नजीकच्या काळात वाढल्याने दाखल गुन्ह्यांच्या प्रकटीकरणा संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी स्वत: लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
चोरीचे सोने तारणात
आरोपींनी गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची पद्धत बदविल्याचे पोलिसांच्या या कारवाईमध्ये पुढे आले आहे. सदर चोरट्यांनी चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने चक्क एका नामांकीत कंपनीत तारण योजनेत ठेवण्यात आले होते. सदर मुद्देमाल तारणात ठेवून या चोरट्यांनी मोठी रक्कम या कंपनीकडून उचलल्याचेही पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे मौल्यवान साहित्य तारण ठेवणाºया कंपन्यांनीही आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.