समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या 'रॉकी'ची चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 05:47 PM2022-09-21T17:47:49+5:302022-09-21T17:49:14+5:30
वनविभागाने पंधरा गावांना दिला सतर्कतेचा इशारा
वर्धा : समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देत थेट नागपूर जिल्ह्यात एन्ट्री करून पुन्हा वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्या पट्टेदार वाघाचा सध्या समुद्रपूर तालुक्यातील तळोदी शिवारात मुक्त संचार होत आहे. या रुबाबदार वाघाने अद्याप मनुष्यावर हल्ला केला नसला तरी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. येत्या २४ तासांत हा वाघ शिकार करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
संबंधित पट्टेदार वाघाचा तोरा बघून त्याला वन्यजीव प्रेमींकडून 'रॉकी' असे संबोधले जात असून तो सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने तळोदी भागातील पंधरा गावांना वनविभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाच्या तब्बल पाच चमूचा वॉच असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित परतता यावे म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेत विशेष प्रयत्न केले जात आहेत.
२२ ऑगस्टला झाला ट्रेस
* संबंधित पट्टेदार वाघ समुद्रपूर तालुक्यातील कांढळी बीटात पाळोदी, हरणखुरी, रामनगर, उमरी शिवारात मुक्त संचार करीत असताना वनविभागाला २२ ऑगस्टला ट्रेस झाला.
* सुमारे सहा दिवस समुद्रपूर तालुक्यातील विविध भागात मुक्त संचार राहिलेल्या या वाघाने वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडून नागपूर जिल्ह्यात २८ ऑगस्टला एन्ट्री केली.
* नागपूर जिल्ह्यातील विविध शिवारात मुक्तसंचार केलेल्या या वाघाने १६ सप्टेंबरला पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी शिवारात एन्ट्री केली.
* हरणखुरी शिवारात एन्ट्री केलेल्या वाघाने सावरखेडा, उंदीरखेडा शिवारात प्रवेश करून १७ सप्टेंबरला कालवरीला ठार केले. याच दिवशी धोंडगावातही काही जनावरांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून गाईला गतप्राण केले.
* त्यानंतर खेरगाव शिवाराकडे माेर्चा वळविलेल्या याच वाघाने १८ सप्टेंबरला एका गाईला जखमी करून एका गाईचा फडशा पाडला. शेतमजूर, शेतकरी, पशुपालक यांची समस्या लक्षात घेता वनविभागाचे बडे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
* खेरगाव शिवारात पाळीव जनावरांवर हल्ला करणाऱ्या वाघाने १८ सप्टेंबरला सावंगी शिवारात एन्ट्री केली. तर नुकतेच म्हणजे १९ सप्टेंबरला या वाघाचे तळोदी शिवारात अनेकांना दर्शन झाले. तर सध्या तो चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगण्यात आले.
रॉकी चार ते पाच वर्षे वयोगटाचा
सद्य:स्थितीत तळोदी शिवारात मुक्त संचार करणारा हा पट्टेदार वाघ चार ते पाच वर्षे वयोगटाचा असून तो नर असावा असा अंदाज वन्यजीव प्रेमींकडून वर्तविला जात आहे. हा पट्टेदार वाघ नेमका कुठला आणि कोण आदीची अधिकची माहिती सध्या वनविभागाचे अधिकारी घेत असले तरी हा 'स्ट्रे-टायगर' (भटका वाघ) असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
रुबाब असा... ट्रॅप कॅमेऱ्यांकडे ढुंकूनही बघे ना..
तळोदी शिवारात मुक्त संचार होणाऱ्या या स्ट्रे-टायगरबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने तब्बल १२ ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पण हा तरुण वाघ ट्रॅप कॅमेऱ्यांकडे ढुंकूनही बघत नसल्याने तो ट्रॅप कॅमेऱ्यातही कैद झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे हा वाघ दिवसा विश्रांती आणि रात्रीला आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे.
'या' गावांना दिलाय सतर्कतेचा इशारा
वन्यजीव प्रेमींकडून रॉकी असे संबोधले जाणाऱ्या पट्टेदार वाघाचा सध्या समुद्रपूर तालुक्यातील तळोदी शिवारात मुक्त संचार होत आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून तळोदी, धामणगाव, सिल्ली, दसोडा, मंगरुळ, केसलापार, रासा, वानरचुवा, साखरा, कोरा, चापापूर, खेक, गिरगाव, नारायणपूर, खापरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, गावागावात वनविभागाचे कर्मचारी जात पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेत नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देत आहेत.