शेतकऱ्यावर रोह्याचा हल्ला
By admin | Published: September 3, 2015 01:53 AM2015-09-03T01:53:25+5:302015-09-03T01:53:25+5:30
नजीकच्या बोदड शिवारात शेतकरी प्रदीप भाऊराव नरांजे (४०) वर्षे याच्यावर दि. ३१ आॅगस्टला स्वत:च्या शेतात सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान रोह्याने हल्ला केला.
बोदड शिवारातील घटना : तक्रार करुनही वनविभागाकडून बेदखल
रोहणा : नजीकच्या बोदड शिवारात शेतकरी प्रदीप भाऊराव नरांजे (४०) वर्षे याच्यावर दि. ३१ आॅगस्टला स्वत:च्या शेतात सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान रोह्याने हल्ला केला. यात त्याच्या हाताला व छातीला गंभीर इजा झालेल्या आहे. रोहणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. या बाबत वनविभागाकडे तक्रार नोंदवूनही अद्याप पंचनामा केला नसल्याची बाब पुढे आली आहे.
रोहणा परिसरात दिवसेंदिवस जंगली श्वापदांचा त्रास वाढला आहे. उभ्या पिकांना हानी पोहचविणारे श्वापदे आता शेतकरी व शेतमजूरांवर हल्ला करून हानी पोहचवत आहे. परिसरात दररोज रानडुकरे व रोह्यांच्या कळपाने शेतीच्या नुकसानीसह शेतकरी व शेतमजूरांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
वनविभाग जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यात अयशस्वी असूनही घटनेचा पंचनामा करून पीडितांना आर्थिक दिलासा देण्यामध्येही उदासिनता दाखवत आहे. यामुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल शेतकरी व शेतमजूरांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
सदर घटना ३१ आॅगस्ट रोजी घडली तरी त्याचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पुढे न पाठविणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वनविभागाने शेतकरी व शेतमजूरांच्या जंगली श्वापदांपासून होणाऱ्या हानीबाबत संवेदनशील राहावे, अशी मागणी समस्त शेतकरी व शेतमजूरांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)