रोहयोवर ८० कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:17 AM2017-11-20T00:17:09+5:302017-11-20T00:17:27+5:30

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Rohoio spent 80 crores | रोहयोवर ८० कोटी खर्च

रोहयोवर ८० कोटी खर्च

Next
ठळक मुद्देरोजगार पुरविण्यात जिल्ह्याचा सातवा क्रमांक : कामासाठी ससेहोलपट थांबली

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती अतिशय चांगली आहे. रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्याकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठ्या प्रमाणात मागणी होते. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगारर हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तेवढ्या दिवसांचा रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर येथील नागरिकांकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढते. त्यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा अगोदरच काम मंजूर करून ठेवतात. नागरिकांची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते १८ नोव्हेंबरपर्यंत मजुरांच्या मजुरीवर ४४ कोटी ५१ लाख ५३ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. साहित्य खरेदीवर ३१ कोटी १२ लाख रूपये खर्च झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा चालविण्यासाठी ३ कोटी ७५ लाख ७१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. असे एकूण ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपये खर्च झाले आहेत. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध झाल्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांची रोजगारासाठी होणारी भटकंती काही प्रमाणात थांबण्यास फार मोठी मदत झाली आहे. यापूर्वी शेतीचा हंगाम संपताच हजारो मजूर नजिकच्या छत्तीसगड, तेलंगणा राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत होत होते. आता मात्र गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरणाची समस्या कमी झाली आहे.
कुशलचा निधी रखडला
रोजगार हमी योजनेत अकुशल कामासाठी निधीची कमतरता नाही. संवर्ग विकास अधिकाºयांनी मस्टरला मान्यता देताच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. मात्र साहित्याचा निधी उपलब्ध होण्यास बºयाचवेळा अडचण निर्माण होते. मागील तीन महिन्यांपासून साहित्याचे बिल निघाले नाही. सुमारे ३ कोटी ७५ लाख रूपये देणे शिल्लक आहे. अनेक ग्रामपंचायती व प्रशासकीय यंत्रणा उधारीवर साहित्य खरेदी करतात. मात्र बिले निघण्यास अडचण निर्माण होते.
२० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती
२०१७-१८ या वर्षात १ लाख २६ हजार ८७५ मजुरांना २० लाख २१ हजार ६६९ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहेरी तालुक्यात १ लाख ३७ हजार, आरमोरी तालुक्यात २ लाख ७० हजार, भामरागड तालुक्यात ३२ हजार ८०८, चामोर्शी तालुक्यात ३ लाख ७ हजार, देसाईगंज तालुक्यात १ लाख ७५ हजार, धानोरा तालुक्यात २ लाख १५ हजार, एटापल्ली तालुक्यात ५७ हजार ८०, गडचिरोली तालुक्यात २ लाख ४० हजार, कोरची तालुक्यात १ लाख ५६ हजार, कुरखेडा तालुक्यात २ लाख ५४ हजार, मुलचेरा तालुक्यात १ लाख २४ हजार, सिरोंचा तालुक्यात ५१ हजार २६० मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत २ हजार ४२३ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Web Title: Rohoio spent 80 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.