प्राथमिक शाळेतील प्रयोगशाळा ठरणार ‘रोल मॉडेल’
By admin | Published: December 29, 2014 01:58 AM2014-12-29T01:58:44+5:302014-12-29T01:58:44+5:30
‘वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कामाविषयी आसक्ती यामुळेच या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची कल्पकता व शिक्षिकांच्या परिश्रमातून साकारलेली ...
पुलगाव : ‘वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कामाविषयी आसक्ती यामुळेच या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची कल्पकता व शिक्षिकांच्या परिश्रमातून साकारलेली ही प्राथमिक शाळा प्रयोगशाळा जिल्ह्यात ‘रोल मॉडल’ ठरणार आहे़ विद्यार्थ्यांनी मुक्तपणे प्रयोगशाळेत प्रयोग करावा़ भाषेच्या प्रयोगशाळेत स्वत: अध्ययन करावे, असे आवाहन जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र काटोलकर यांनी केले.
स्थानिक बढे प्लॉट येथील जि.प. प्राथमिक शाळेत जि.प. शिक्षणाधिकारी काटोलकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका, विद्यार्थी व लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिल्या प्राथमिक शाळा विज्ञान व भाषा प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली. अत्यंत टाकाऊ वस्तू की, ज्याची कवडीमोल किंमत असलेल्या वस्तूंपासून साकार केली़ ही प्रयोगशाळा भूगोल, ग्रंथालय, विज्ञान व भाषा विभागात विभागण्यात आली आहे. यात बाल कलावंतांनी शाळेच्या भितींचा उपयोग काळा रंग लावून फळ्यासारखा केला आहे. त्यावर विद्यार्थ्यांना आपल्या वैचारिक बाबीची वजा-बाकी, गुणाकार, भागाकार उपकरणाची आकृती काढण्यासाठी केला आहे. या भिंती फलकावर विविध सुभाषिते, प्रायोगिक तत्वे, विज्ञान व भूगोल विषयाची माहिती दिली आहे़ प्रयोगशाळेतील टेबलवर काही प्रायोगिक उपकरणे व प्रयोगदेखील केले आहेत. विज्ञान प्रयोगशाळेत वैज्ञानिक युगात वावरताना आवश्यक ज्ञानाची पूर्ती होते.
भाषा विभागात विद्यार्थ्यांना हसत - खेळत संभाषणातून भाषेचा व बुद्धीचा विकास कसा करावा, याची माहिती मिळते. ग्रंथालय विभागातून छोटेखानी असले तरी विद्यार्थ्यांनी बुद्धीमत्ता पणास लावली आहे़ शिवाय जगातील प्राणीमात्र व शरीर विज्ञानाची माहितीही या प्रयोगशाळेतून मिळते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, विस्तार अधिकारी ओंकार खिरोळे, प्रकाश तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य योगिनी पोहेकर, मुख्याध्यापिका वर्षा सुरपांग, केंद्र प्रमुख संगीता शेरके, सुरेखा कामटकर, प्रफूल राऊत, सुषमा रणधाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)