शेतकºयांकरिता सत्तेत विरोधकाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:20 PM2017-09-08T22:20:59+5:302017-09-08T22:21:11+5:30
शिवसेना मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी आहे. पण शेतकºयांच्या समस्यांबाबत शिवसैनिक विरोधकांचीही भूमिका बजावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिवसेना मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी आहे. पण शेतकºयांच्या समस्यांबाबत शिवसैनिक विरोधकांचीही भूमिका बजावत आहे. सत्तेत असो किंवा नसो शेतकºयांच्या समस्यांकरिता शिवसैनिक नेहमीच त्यांच्या पाठिशी राहील, असा विश्वास परिवहन मंत्री राज्यमंत्री आणि शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.
वर्धेत शिवसैनिकांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविण्याकरिता ते विदर्भाच्या दौºयावर आले होते. यावेळी वर्धेत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही तर शेतकºयांच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास यश नक्की पदरात पडेल, असा सल्ला कार्यकर्त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विदर्भात पावसाची स्थिती बिकट आहे. अनियमित पावसामुळे खरीप पुरता हातचा गेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून शेतकरी रबीच्या नियोजनाचा विचार करतो. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी खरीपात कामी आली नाही. यामुळे शासनाने खरीपात जाहीर केलेली कर्जमाफीची प्रक्रीया पूर्णत्त्वास नेत रबीच्या कर्ज वितरणाचा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली.
सध्या शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीन, मुंग, उडिद आदि पिके हातची गेली आहेत. तर कापूस आणि तूर केवळ ६० टक्के उत्पन्न देणार अशी स्थिती आहे. यामुळे कोण काय करतो हे बोलण्यापेक्षा शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सध्या आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रत्येक केंद्रावर जात शेतकºयांना मदत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना करण्यात आल्या आहेत.
सत्तेत नसताना शिवसेनेच्यावतीने हमीदराच्या मागणीकरिता घेतलेली आग्रही भूमिका कायम आहे. येत्या दिवसात हमीभावाबाबत मुख्यमंत्री एक कायदा जाहीर करणार आहे. तो कायदा जाहीर होताच त्याचे वास्तव समोर येईल, असेही ना. रावते म्हणले. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पवारांचा विरोध कळला नाही
शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी हमीभाव वाढीचा कायदा केला नाही. सत्तेत असताना दुर्लक्ष करून आता विरोधात असताना तशी मागणी करणे आपल्या समजण्यापलिकडे आहे. सध्या सत्तेत गुरू शिष्याचे नाते चर्चेत आहेत. यातून काय निर्णय होतो, तो कळेलच. पण गुरु कोण आणि शिष्य कोण या बाबत मात्र ना. रावते यांनी चुप्पी साधली.