‘सुपर कम्युनिकेशन वे’ बाबत भूमिका अस्पष्ट
By admin | Published: August 17, 2016 12:52 AM2016-08-17T00:52:13+5:302016-08-17T00:52:13+5:30
नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे
शेतकऱ्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सेलू : नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे. शिवाय २१ टाऊनशिपचा यामध्ये समावेश आहे. यात सेलू तालुक्यातील सेलडोह, येळाकेळी, पुलगावचा समावेश आहे. याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शासनाची याबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनात बाजारभावापेक्षा चारपट मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. भूमि अधिग्रहण कायद्यांसंदर्भात संपूआ आघाडीने जी भूमिका घेतली ती या सरकारने घ्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आला आहे. रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सेलू तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
या महामार्गाला विरोध नाही. मात्र शासनाची भूमिका संदिग्ध आहे, असे निवेदनात नमुद केले आहे. शिवाय शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. याबाबत समीर देशमुख म्हणाले की, सूपर कम्युनिकेशन वे ची संकल्पना चांगली आहे. विकासाबाबत आमची भूमिका सदैव सहकार्याची आहे. मात्र हे करताना कुणावरही अन्याय होऊ नये. आज तालुक्यातील शेतकरी संभ्रमात आहे. शासनाने खुलेपणाने शेतकऱ्यांशी चर्चा करावी यासाठी हे निवेदन देण्यात येत असल्याचेही नमुद केले आहे. यावेळी तहसीलदार रवींद्र होळी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मिलिंद हिवलेकर, बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, हरिभाऊ झाडे, मोरेश्वर नाखले, कोटंबकार, महानाम रामटेके, श्याम वानखेडे, नितीन फासगे, उल्हास रणनवरे, दिलीप ठाकरे, रामु पवार, अनिल जिकार, दिलीप गावंडे, नरेश खोबे, शुभम झाडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)