‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 12:12 PM2021-12-19T12:12:45+5:302021-12-19T12:22:35+5:30
मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले.
महेश सायखेडे
वर्धा : गोचडीपासून पसरणारा आजार अशी इहर लिचियाची ओखळ. रॉटव्हीलर प्रजातीच्या ‘ओरिओ’ या श्वानाला याची लागण झाल्याने त्याची हिमोग्लोबिन पातळी चक्क चारपर्यंत आली. अशा परिस्थितीत मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चक्क त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले. ही ब्लड ट्रान्सफ्यूजन प्रक्रिया पशुचिकित्सक डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.
शहरातील पूलफैल भागातील लेनीन कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले. अशातच ओरिओची हिमोग्लोबिन पातळी थेट चारपर्यंत आल्याने त्याला रक्त देण्याची गरज होती.
दरम्यान, याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र या श्वानाचे मालक कुबल भाकरे यांना मिळाली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करून ओरिओचे प्राण वाचविण्यासाठी होकार दिला. शिवाय उपचार करण्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडील असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवनदान देण्यात आले. एकूणच मनुष्यासह प्राण्यांमध्येही रक्तदान हे श्रेष्ठदान ठरत आहे, हे विशेष.
ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर देण्यात आले रक्त
मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून रुद्र या श्वानाचे रक्त देण्यात आले. या प्रक्रियेसाठी डॉ. संदीप जोगे यांना दीप जगताप, रोहित दिवाने, विशाल मानकर यांनी सहकार्य केले.
रुद्रने यापूर्वी दिले माऊलीला जीवनदान
गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या माऊली या श्वानालाही यापूर्वी रुद्र या श्वानानेच रक्तदान करून जीवनदान दिले होते. त्यावेळी माऊली या श्वानाची हिमोग्लोबिन पातळी दोनपर्यंत आली होती, हे विशेष.