अवैध वृक्षतोडीमुळे ऋतूत परिवर्तन
By admin | Published: July 16, 2015 12:10 AM2015-07-16T00:10:29+5:302015-07-16T00:10:29+5:30
बेसुमार व अवैध वृक्षतोड होत असल्यामुळे नैसर्गिक वातावरणात बराच बदल घडत
पावसाची प्रतीक्षा : पर्यावरणपूरक योजना ठरतात नाममात्र
सेलू : बेसुमार व अवैध वृक्षतोड होत असल्यामुळे नैसर्गिक वातावरणात बराच बदल घडत असल्याचे दिसून येत आहे. असे तज्ज्ञ सांगतात. याचे थेट परिणाम ऋतुचक्रावर होत असल्याने अनियमित पर्जन्यमान याचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. जुलै महिन्यात पंधरवाडा लोटला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढू नये म्हणून केंद्र आणि राज्य शासन शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवित आहे. या योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र त्या योजनेच्या निकषानुसार अंमलबजावणी करण्यास संबंधित प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने ही योजना नाममात्र ठरते. या योजनेतून वृक्षांचे संवर्धन बोटावर मोजण्या इतपत झाले असल्याचे बोलले जाते. शेत शिवारात असलेल्या वृक्षाची कत्तल होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.
ग्रामीण भागातील शेत शिवार विरळ होत आहेत. हल्ली चाललेले हे सर्व प्रकार बघून नागरिकांसमोर एकच प्रश्न उपस्थित होते की, यावेळी जिल्ह्यात व तालुक्यात वन विभागाचे अस्तीत्व आहे किंवा नाही. पर्यावरण प्रदुषणामुळे सध्या अस्तीत्वात असलेले जीव जंतू यावेळी बऱ्याच कठीण गंभीर समस्यांचा सामना करीत आहेत. वातावरणाच्या फेरबदलामुळे सर्वच प्रभावित आहे.
शेतात असणाऱ्या वृक्षांच्या संख्येप्रमाणेच गाववस्तीत वृक्षांची संख्या पुरेशी होती. त्यामुळे जिकडे-तिकडे हिरवेगार वातावरण उत्पन्न होवून सर्व ऋतु ठराविक मर्यादेप्रमाणे होत असत. मात्र आता कोणतेही ऋतु वेळेवर येत नसून हा काळ उन्हाहाच आहे. असे नागरिकांना जाणवत आहे. पूर्वी सर्व ऋतु वेळेवर व सुरळीत असायचे मात्र आता एकच ऋतु म्हणजे उन्हाळाच असल्याचा भास होत आहे. ही अवैध वृक्षतोड थांबविण्यात वन विभागाला अपयश येत असल्याचे दिसते. यावर प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)