२,५३६ 'लाडक्या लेकीच्या खात्यावर १ कोटी २६ लाख ८० हजार रुपये जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:44 IST2025-01-24T17:43:19+5:302025-01-24T17:44:44+5:30
मुलींच्या पालकांच्या खात्यावर जमा : सावित्रीच्या लेकींच्या जन्माचे होतेय स्वागत

Rs. 1 crore 26 lakh 80 thousand deposited in the account of 2,536 'Ladkya Leki'
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा, मुर्लीच्या जन्माचे स्वागत व्हावे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'लेक लाडकी' योजना हाती घेण्यात आली. या योजनेतून आजवर सुमारे २ हजार ५३६ लाभार्थी मुर्लीच्या पालकांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १ कोटी २६ लाख ८० हजार रुपये जमा केले आहेत.
शासनाने २०२३-२४ मध्ये 'लेक लाडकी' योजना हाती घेतली. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्या-टप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. जन्मानंतर ५ हजारांचा पहिला टप्पा दिला जातो. जिल्ह्यात ही योजना सुसाट सुरू आहे. आजवर सुमारे २ हजार ८६३ अर्ज आले होते. यापैकी २ हजार ५३६ मुलींच्या पालकांच्या खात्यावर १ कोटी २६ लाख ८० हजार रुपये जमा केले आहेत.
लेक लाडकी' योजनेचा नेमका काय आहे उद्देश?
- राज्यात मुर्लीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुर्लीच्या शिक्षणास चालना मिळावी, यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे.
- मुलींचा मृत्यूदर कभी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ही लेक लाडकी योजना महत्वपूर्ण ठरेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
७५ हजार मिळतात अठराव्या वर्षी
मुलीचा जन्म झाल्यानंतर पहिला टप्पा म्हणून ५ हजार रुपये दिले जातात. यानंतर इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर १७ हजार रुपये, ११वीत गेल्यावर ८ हजार रुपये, तर १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळतात, अशी ही योजना आहे.
अर्ज कुठे करावा ?
पात्र मुलींच्या पालकांना अर्ज शहरातील वा गावातील नजीकच्या अंगणवाडीमध्ये योजनेसाठी अर्ज करता येतो.
तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या
आर्वी - २३८
आष्टी - १४६
देवळी - २१४
हिंगणघाट - २२०
कारंजा - ११२
समुद्रपूर - २०६
सेलू - २५२
वर्धा १ - ३२३
वर्धा २ - २१७
वर्धा (नागरी) - ५९८