वांगी शेतकऱ्यांकडून 13 रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात 30 रुपये किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:00 AM2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:16+5:30
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : हल्ली शेतकऱ्यांच्या वांगी, भेंडी, चवळीसह इतरही भाजीपाल्यांचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा भाजीपाला कवडीमोल भावाने खरेदी केला जातो, शेतकऱ्यांना मिळालेल्या भावाच्या दुप्पट भावाने ग्राहकांना विकला जातो, त्यामुळे याचा कवडीचाही फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत नाही.
भाजीपाल्याच्या ढासळलेल्या भावबाजीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी, चवळी या भाजीपाला वर्गीय उभ्या पिकात जनावरे सोडलीत, तर काहींनी पिकाची निगा राखणे सोडले, पावसाळ्याचे अडीच महिने संपले असताना आपल्या जिल्ह्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उत्पादित चवळी शेंगा, भेंडी, पालक, वांगी, काकडी, ढेमस आदी भाजीपाल्याचे दर कोसळले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीच्या कैचीत सापडला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या दरवाढीने मात्र, ग्राहकांच्याही खिशाला आर्थिक झळ पोहचत असून गृहिणींचेही बजेट कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
यंदा तर भाजीपाला उत्पादनाचे वाटोळे झाले आहे. यावर्षी एक एकर शेतात वांग्याची लागवड केली, ऐन वांगी निघण्याच्या भरातच वांग्यांचा दर कोसळला. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकाची निगा राखणे सोडावे लागले, कीटकनाशके फवारणीचेसुद्धा पैसे निघत नव्हता.
- किशोर लुंगे, शेतकरी जामनी
आज मी भेंडी विकायला नेली असता फक्त ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागली, केव्हा केव्हा तर तोडणीचाही खर्च निघत नाही. बरेचदा माल मंडीत ठेऊन रित्या हाताने घरी परतावे लागते.
-विजय बेलसरे, शेतकरी जामनी,
ग्राहकांना परडवेना
भाजीपाल्याचे भाव फक्त भाजीमंडीतच कोसळतात, यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कोसळलेल्या दराचा भाजीपाला मात्र दारावर येताच याची दामदुप्पट होते व नाईलाजाने तो घ्यावाच लागतो.
- प्रगती भोयर, गृहिणी,
चवळीच्या शेंगा अन् भेंडीचे दर फारच कमी झाले म्हणते पण प्रत्यक्षात दारावर भाजीपाला घेतला तर मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याचे जाणवत नाही , ४० रुपये किलोच्या खाली कोणताही भाजीपाला मिळत नाही.
- आशाबाई पन्नासे, गृहिणी,
भावात एवढा फरक का?
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते, यामुळे आवक वाढली पण मागणीही घटली यामुळे चवळी शेंगा, वांगी व भेंडीची पुरती वाट लागली आहे,तसेच इतरही भाजीपालावर परिणाम झाला आहे,यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली,आणि चिल्लर भाजी विक्रेते त्यांचा वाहतूक व इतर खर्चवजा करून भाजीची विक्री करतात यामुळे ग्राहकाला याचा विशेष फायदा होत नाही,
- प्रमोद फटिंग, भाजीपाला व्यापारी,