देवळीत ४.१६ लाखांचा जुगार
By admin | Published: September 2, 2016 02:02 AM2016-09-02T02:02:24+5:302016-09-02T02:02:24+5:30
पोळ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी चिकणी (जामणी) येथे धाड घालत जुगार प्रतिबधंक कायद्यान्वये कारवाई केली
न.प.उपाध्यक्ष व कृउबास संचालकांचा सहभाग
देवळी : पोळ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी चिकणी (जामणी) येथे धाड घालत जुगार प्रतिबधंक कायद्यान्वये कारवाई केली. यात ४ लाख १६ हजारांचा मुुद्देमाल जप्त केला आहे. या जुगारात येथील पालिकेचे उपाध्यक्ष, बाजार समिती संचालक व व्यापाऱ्यांचा समावेश असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रानुसार, चिकणी (जामणी) येथील अशोक कारोटकर यांच्या शेतातील बंड्यात जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बाजार समितीचे संचालक मंगेश वानखेडे रा. वाटखेडा तसेच न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, व्यापारी राममनोहर टावरी, उमेश कामडी व आबीद शेख सर्व रा. देवळी यांना जुगार खेळतांना पकडण्यात आले. या आरोपींवर जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये अटकेची कारवाई करून जामिनावर सुटका करण्यात आली.
या कारवाईत एक लाख तीन हजार ७०० रुपये रोख तसेच, दोन लाख आठ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी व मोबाइल असा एकूण ४ लाख १६ हजाराचा दस्तावेज जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)
सेलूतही जुगार अड्ड्यावर धाड
सेलू - येथील पोलिसांनी पोळ्याच्या सायंकाळी एका जुगार अड्ड्यावर धाड घातली. यावेळी पोलिसांनी पकडलेल्या जुगारात तहसीलचे कर्मचारी, काही शिक्षक व शहरातील मोठे व्यापाऱ्यासह डझनभर लोक असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरण दडपण्यासाठी काही बडी मंडळी ठाण्यात सेटींगच्या दृष्टीने हालचाली करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रानेच दिली. सेलू पोलीस मात्र चौकशीच्या नावावर मौनधारण केले होते.