‘सिग्नल्स’वर केलेला 50 लाखांचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:00 AM2020-12-11T05:00:00+5:302020-12-11T05:00:07+5:30
प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या चौकांत पाच ते सहा वर्षांपूर्वी सिग्नल्स उभारण्यात आले. अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च या उपक्रमावर झाला. मात्र, हा उपक्रम फोल ठरला.
प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले.
तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक शशिकांत भांडारे यांच्या देखरेखीत शहरातील बजाज चौक, आर्वीनाका, शिवाजी चौक, आरती चौक, धुनिवाले चौक आदी मुख्य चौकात सिग्नल उभारण्याचे काम सुरु झाले. सिग्नल लागलेही पण, मात्र, अवघ्या काही दिवसांत ते बंदही झाले. आज सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असूनही शहरातील सिग्नल मात्र, सुरु झालेले नाही.
यामध्ये बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे उभारलेले सिग्नल पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा बसविण्यात आले, बांधकाम विभाग आणि पालिकेत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशुन्यतेमुळे वर्धेकार आजही सिग्नल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
मात्र, सिग्नलवर झालेला लाखोंचा खर्च हा वाया गेल्याने ही भरपाई कोण करणार, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून सिग्नल उभारणीवर झालेला खर्च किती लागला. हे तपासण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तत्काळ याबाबतची चैाकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
जबाबदारी नेमकी कुणाची?
सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करुन शहरात उभारण्यात आलेल्या सिग्नलची अवस्था आज बिकट झाली आहे. रस्ते निर्माण झाले पण, सिग्नलचे दिवे अजूनही बंदच आहे. झालेला खर्च व्यर्थ गेला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अधांतरीच राहिले. बांधकाम विभाग नगरपालिका आणि नगरपालिका बांधकाम विभागाला दोषी ठरवत जरी असले तरी नेमकी ही जबाबदारी कुणाची होती, हा उपक्रम बंद पडल्याने कितीचे लाखांचे काम झाले, कितीचे नाही, शिल्लक असलेला निधी कुणाकडे गेला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.
वाहतूक बुथ ठरतेय शोभेचे
बजाज चौक आणि आर्वी नाका चौकात सिग्नल उभारणी केल्यावर वाहतूक पोलिसांसाठी बुथ तयार केले होते. मात्र, सिग्नल सुरुच न झाल्याने आजही ते वाहतूक बुथ आहे त्याच ठिकाणी पडून आहे. मोकाट श्वान आणि जनावरांसाठी ते बुथ सध्या निवासस्थान बनले आहे. चौकाच्या मध्यभागात उभारण्यात आलेले बुथ सध्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
काही सिग्नल चोरी, तर काही तुटले
आर्वीनाका चौकात आणि आरती चौकात लावलेले सिग्नल वादळी वाऱ्याने जमिनीवर पडले होते. अनेक दिवस सिग्नल रस्त्यावरच पडून होते. काही लोखंडी दिवे चोरट्यांनी चोरुन नेले. तर जे दिवे जमिनीवर पडले होते त्यांना उचलुन नगरपालिकेच्या इमारत आवारात धुळखात ठेवण्यात आले आहे.