आर्वी बाजार समितीला 80 लाखांचा फटका; सर्वच समित्या बंदमध्ये सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:00 AM2020-12-10T05:00:00+5:302020-12-10T05:00:05+5:30
जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते. त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनांनी मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची पूर्वसूचना शेतकरीबांधवांना दिली होती. त्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहारच झाले नाहीत.
जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते. त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही.
देवळी येथे बंदच्या दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या दिवशी चार ते साडेचार कोटींच्या व्यवहारातून चारशे गाड्यांतील कापसाची खरेदी करण्यात आली. बंदच्या पूर्वसंध्येला बाजारात आलेल्या सर्व कापूस गाड्यांची खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली नाही. बंदच्या दिवशी मात्र मार्केट यार्डमध्ये कमालीचा शुकशुकाट होता. तर आर्वी येथील बाजार समितीला बंदमुळे ७० ते ८० लाखांचा फटका बसला. या बाजार समितीनेही शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली. बुधवारी अत्यल्प शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आले होते. वर्धा बाजार समितीही बंद असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. या बाजार समितीत शेतमालाची आवकही अल्पशीच आहे.
दिवसभरात कोटींचे व्यवहार ठप्प
यावर्षी सोयाबीनचे उत्पादन ३० टक्के तर नापिकी ७० टक्के अशी स्थिती आहे. कापसाचे उत्पादनदेखील यावेळी निम्म्यावर आले आहे. त्यामुळे सोमवारी आलेल्या मालाची विक्री आणि मोजमाप दुपारपर्यंतच आटोपले. नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव आणि आवक झालेल्या शेतमालाची त्याच दिवशी दुपारपर्यंत विक्री होत असल्याने मार्केटमध्ये गर्दीच होत नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रात्री शेतमालाची आवक होत नाही. हिंगणघाट, वर्धा बाजार समितीत ५ ते ७ कोटींची उलाढाल ठप्प झाली.
यंदा शेतमालाचे उत्पादन नाममात्रच आहे. बंदमध्ये बाजार समित्या सहभागी झाल्या तरी नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव व मार्केट बंदची माहिती तसेच शेतकऱ्यांचा बंदमध्ये स्वेच्छेने सहभाग यामुळे मार्केटला फटका बसला नाही.
- ॲड. सुधीर कोठारी, सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.
भारत बंद असल्याची माहिती पूर्वीच मिळाली. त्यामुळे सोमवारी कुणीही कापूस गाड्या भरून मंगळवारी खरेदी होणार्या काट्यावर आणल्या नाहीत. बाजार समितीनेही सूचना दिली होती. त्यामुळे बुधवारी कापूस विक्रीसाठी आणण्यात आला.
- महेश बावणे,
शेतकरी, पिंपळगाव.
भारत बंदची सूचना अगोदरच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून मिळाल्याने बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरीवर्गाने कापूस विक्रीस आणला नाही. बुधवारला कापूस विक्रीसाठी आणला. त्यामुळे कुठलीही गैरसोय झाली नाही.
- रणजित तेलंगे,
शेतकरी, देऊळगाव.