आरटीओ करणार अॅफकॉनच्या वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:28+5:30
विविध साहित्याची ने-आण करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही खबरदारीचे उपाय केले जात नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत आहे. शिवाय जड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांसह नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन कंपनीच्या मनमर्जीचा नाहक त्रास रसुलाबादसह परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जड वाहतुकीमुळे वर्धा-रसुलाबाद मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. माहिती देऊनही अॅफकॉनचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरपंच राजेश सावरकर यांनी एसडीओंना तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी रसुलाबाद गाठून पाहणी केली. त्यानंतर अॅफकॉन कंपनीच्या वाहनांची संपूर्ण वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी दिल्या आहेत.
समृद्धी महामार्गासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांमध्ये लादून त्याची वाहतूक वायफड मार्गाने केली जात आहे. विविध साहित्याची ने-आण करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही खबरदारीचे उपाय केले जात नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत आहे. शिवाय जड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांसह नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो. शिवाय मद्यधुंद वाहनचालक शेतकऱ्यांनाच धमकावत असल्याने याबाबची तक्रार उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
याच तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेथील विदारक परिस्थिती बघितल्यावर उपविभागीय महसूल अधिकारी बगळे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला लेखी सूचना निर्गमित करून अॅफकॉनच्या संपूर्ण वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तपासणीदरम्यान कुठलाही गैरप्रकार आढळल्यास उपप्रादेशिक परिवहन विभाग दोषींवर कठोर कारवाई करणार आहे.