जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ करेल धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:00 AM2021-10-28T05:00:00+5:302021-10-28T05:00:07+5:30
दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी तसेच भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळगावी परततात. त्यामुळे या दिवसात मेट्रो सिटीतून येणाऱ्या व मेट्रो सिटीत परतणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी राबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दाेन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही सदर मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धेत येणाऱ्यांची संभाव्य पिळवणुकीला ब्रेक लागला होता.
तीन निरीक्षकांचा राहणार वॉच
- दिवाळी, भाऊबीज व इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्याने प्रवाशांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. या दोन चमूत तीन निरीक्षकांचा समावेश राहणार असून त्यांच्याकडून प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
५०० वाहन तपासण्याचा मानस
- दिवाळीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेचा प्रवाशांनाही मोठा फायदा झाला होता. शिवाय दिवाळीनिमित्त होणाऱ्या पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागला होता. तर यंदाही ही मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून यंदा किमान ५०० खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचा मानस वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आहे.
मागील वर्षी तपासली ३२८ वाहने
- दिवाळीचे औचित्य साधून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मागील वर्षी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२८ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तर यंदा ५०० वाहनांची तपासणी करण्याचा मानस आहे.
दिवाळीनिमित्त अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी येतात. याचाच फायदा घेत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता असते. याच प्रकाराला आळा घालण्यासाठी यंदाही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आली आहेत.
- तुषारी बोबडे, प्रभारी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.